
कल्याण दि.५ डिसेंबर :
कल्याण डोंबिवली महापालिकेकडून अनेक नागरी प्रश्न प्रलंबित ठेवल्याविरोधात जागरूक नागरिकांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. कल्याणात केडीएमसी मुख्यालयाबाहेर जागरूक नागरिक फाऊंडेशनअंतर्गत हे आंदोलन सुरू करण्यात आले असून प्रश्नांची सोडवणूक होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे न घेण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
या मुद्द्यांवर सुरू आहे पालिकेविरोधात आंदोलन…
टिटवाळा येथे ३८ एकर जागा साथ नियंत्रण रुग्णालय आणि मेडीकल कॉलेजसाठी आरक्षित आहे. परंतु अद्याप प्रशासनाने कोणतीही जागा ताब्यात घेतलेली नसून ती ताब्यात घेणे,
बांधकाम व्यावसायिकांप्रमाणे सामान्य नागरिकांचाही ओपन लॅड टॅक्स कमी करणे,
आधारवाडी डंपिंग ग्राउंड बंद केलेबाबत प्रशासन खोटे बोलत असून अद्यापही तिकडे ओला आणि सुका कचरा टाकला जात आहे,
कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवर प्रचंड खड्डे असून हे रस्ते चालण्यास आणि वाहतुकीला योग्य नसून ते योग्यस्थितीत आणणे,
रस्ते किंवा इतर प्रकल्पात धनदांडग्या लोकांना अवास्तव मोबदला देण्यात आल्याचा आरोप करत बाधित सामान्य नागरिकांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नसून ते तातडीने मिळणे,
महापालिका क्षेत्रात पिण्याच्या पाण्याचे समान वाटप वाटप करणे,
टीडीआर स्वरूपात महापालिकेकडे आलेले भूखंड भूमाफियांनी गिळंकृत केले असून महापालिकेचे भुखंड राखले जावेत,
न्यायमूर्ती अग्यार समितीच्या चौकशीत अनधिकृत बांधकामांशी संबंधित ७२ महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे,
महापालिका क्षेत्रातील भूखंडांचे सर्वेक्षणासाठी सव्वा दोन कोटी रुपये भरूनही अद्याप नकाशे न मिळाल्याने होणारी नागरिकांची गैरसोय दूर करणे.
या प्रमूख मागण्यांसाठी जागरूक नागरिक फाऊंडेशनचे धरणे आंदोलन आजपासून सुरू झाले आहे. जोपर्यंत हे सर्व मुद्दे महापालिका प्रशासनाकडून निकाली निघत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती अध्यक्ष श्रीनिवास घाणेकर यांनी दिली. यावेळी ॲड. उदय रसाळ, वंदना सोनवणे, योगेश दळवी, विजय भोसले, चेतना रामचंद्रन आदी नागरिकही सहभागी झाले आहेत.