Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीतील क्लस्टर योजनेसाठी इथल्या विकासकांनी पुढे यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण डोंबिवलीतील क्लस्टर योजनेसाठी इथल्या विकासकांनी पुढे यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याणातील एमसीएचआय प्रॉपर्टी प्रदर्शनाला दिली भेट

कल्याण दि.10 फेब्रुवारी :
क्लस्टर योजना राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. कल्याण डोंबिवलीतही क्लस्टर योजनेची आवश्यकता असून आपण प्रत्येकाने एक एक क्लस्टर विकसित करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. कल्याणच्या फडके मैदानात आयोजित 13 व्या एमसीएचआय क्रेडाईच्या प्रॉपर्टी एक्सपोला मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी हे आवाहन केले.(Developers should come forward for the cluster scheme in Kalyan Dombivli – Chief Minister Eknath Shinde)


मुंबई ठाण्यानंतर कल्याणचा वेगवान विकास…

मुंबई आणि ठाण्यानंतर कल्याण हे सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर आहे. इकडे विकासक केवळ घरे बांधून पैसे कमावण्याचा कल नसून शहराच्या विकासातही आपण योगदान देत आहात. कल्याण डोंबिवलीमध्ये आपण मोठे रस्ते करत आहोत, फ्लायओव्हर करत आहोत, सुशोभीकरणही करतोय, रिंग रोड होतोय, दुर्गाडी पुलाचे काम पूर्ण झाले असून आता शीळफाटा ते कोन गावपर्यंत एलीव्हेटेड आम्ही रस्ता करतोय. ज्यामुळे इथला वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम स्वरुपी निकाली निघेल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

ठाणे आणि मुंबई एमएमआरमध्ये खूप पोटेंशियल आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे जे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यामध्ये 1 ट्रिलियन डॉलरचे योगदान महाराष्ट्राला करायचे आहे. काही दिवसांपूर्वी निती आयोगाचे प्रतिनिधी इकडे आले होते, त्यांनी सांगितले की एक ट्रिलियन डॉलरचे पोटेंशियल हे केवळ मुंबई एमएमआर रीजनमध्ये असून बाकी उर्वरित महाराष्ट्राची वेगळी ताकद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उद्योजक व्यावसायिकांची महाराष्ट्रालाच पसंती…
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये यंदा महाराष्ट्रासाठी 3 लाख 73 हजार कोटींचे एमओयू वर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. आणि त्यापैकी 80 टक्के कामाला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी 1 लाख 37 हजार कोटींचे एमओयू झालेत. महाराष्ट्राला व्यावसायिकांची पसंती मिळत आहे. कारण आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मनुष्यबळ आहे. आणि आपल्यासारख्या विकासाकांमुळे महाराष्ट्राचाही विकास होत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

ज्या ज्या वेळी संकट आले सरकारने विकासकांना नेहमीच मदत केली आहे. कोविड काळातही आम्ही तुम्हाला ऑक्सिजन उपलब्ध करून दिला पण व्हेंटीलेटरवर जाऊ दिले नाही. राज्य सरकारने एफएसआय वाढवला आहे, टीडीआर वाढवला आहे, युनिफाईड डीसीआरच्या माध्यमातूनही शासनाने विकासकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. आधी विकासकांना इंच इंच जागा मोजावी लागायची. मात्र आम्ही हे निर्बंध शिथिल करत तुमच्यासाठी मैदान खुले करून दिले. कारण तुम्हाला आम्ही जास्त दिले तर ग्राहकाला कमी पैशांत घर मिळेल. मात्र तुम्हाला ज्या सुविधा देऊ त्याचा लाभ ग्राहकालाही द्या असे सांगण्यासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विसरले नाहीत.

ठाणे आणि पुण्याच्या धर्तीवर कल्याण डोंबिवलीतही 9 मीटर रस्त्यांवर 8 मजल्याचा एफएसआय देण्याच्या मागणीला मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हेदेखील आपण लागू करू असे आश्वासन यावेळी दिले. त्यामुळे उपस्थित बांधकाम व्यावसायिकांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले. तर कल्याणातील मेट्रो रेल्वे ही खडक पाडामार्गे जाणार असल्याचा पुनरुच्चारही केला.

यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, एमसीएचआय कल्याण डोंबिवलीचे रवी पाटील, भरत छेडा, सुनिल चव्हाण, अरविंद वरक, मिलिंद चव्हाण, विरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा