वै. ह.भ.प. सावळाराम महाराज स्मारकाचा प्रस्ताव दाखल करण्याचेही निर्देश
मुंबई दि. ३ मे :
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांतील मालमत्ता करांबाबत, गावठाण आणि त्याबाहेरील बांधकामांबाबत सर्वंकष धोरण ठरवण्याबाबत सर्व्हेक्षण करा. तसेच गरज भासल्यास समिती स्थापन करण्याचे महत्वपूर्ण निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी येथे दिले.
२७ गावांतील विविध प्रश्नांसंदर्भात सर्वपक्षीय संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी वै. ह.भ. प. सावळाराम महाराज स्मारक, तसेच भिंवडी-कल्याण-शीळफाटा रुंदीकरणातील बाधितांच्या मोबदल्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. (Determine policy regarding property tax, construction works in 27 villages- Chief Minister Eknath Shinde)
स्मारक भव्य आणि उत्तम दर्जाचे व्हावे यासाठी नियोजन करा…
वै. ह.भ.प. संत सावळाराम महाराज यांचे यथोचित स्मारक व्हावे ही ग्रामस्थांची भावना महत्वाची आहे. त्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत आणि हे स्मारक यासाठीचा संयुक्त भूखंडही निश्चित करण्यात आला आहे. इमारत आणि स्मारकाबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्यास सांगतानाच हे स्मारक भव्य आणि उत्तम दर्जाचे व्हावे यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.
२७ गावांतील मालमत्ता कर आणि बांधकामांबाबत धोरण निश्चित करा…
कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांच्या विविध मागण्या आहेत. या मागण्यांबाबत त्यांच्या नागरी समस्या सोडविण्याकरिता सर्वंकष धोरण आखण्याची आवश्यकता आहे. या गावांच्या मालमत्ता कराबाबत आणि या गावातील बांधकामांबाबत एक धोरण निश्चित करावे लागेल. त्यासाठी सर्वेक्षण करणे, आवश्यकता भासल्यास समिती स्थापन करणे याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत दिले.
भूसंपादनासाठी दर आणि धोरण निश्चित करा…
भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या रुंदीकरणात काही गावांतील जमीनींचे भूसंपादन झाले, पण त्यांचा मोबदला योग्यदराने गेला नाही. त्यावर राज्य रस्ते विकास महामंडळ आणि जिल्हाधिकारी यांनी संयुक्तपणे पाहणी करावी आणि त्याबाबतचे धोरण आणि दर निश्चित करावे. जेणेकरून या गावांना वारंवार मोबादल्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही. हा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी कार्यवाही करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
कल्याण शिळ मार्गाला संत सावळाराम महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय लवकरच…
कल्याण शिळफाटा सहा पदरी राज्यमार्गाला संत सावळाराम महाराज यांचे नाव देण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. याबाबत निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तर २७ गावांतील रस्त्यांसाठी ३५० कोटी रुपये, तसेच पाणी पुरवठा योजनांसाठी २०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी दिली.
ITP प्रकल्पांना नियमानुसार ६६% सुट देण्याची सूचना…
तर घरमालकांना बजावलेल्या जप्तीच्या नोटीस मागे घेऊन २००२ च्या कर-दर आकारणीप्रमाणे कर आकारणी करावी. तसेच पलावा आणि रुणवाल सारख्या ITP प्रकल्पांना नियमानुसार ६६% सुट देऊन सुधारीत बिल पाठविण्याची विनंती यावेळी आमदार राजू पाटील यांनी केली. त्यावर जप्तीच्या नोटीस त्वरित मागे घेऊन याविषयी एक समिती स्थापन करून नव्याने कर आकारून बिल पाठण्यासह ITP प्रकल्पांना नियमानुसार ६६% सुट देण्याची सूचना सुचना मुख्यमंत्री शिंदे यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना केल्या.
या बैठकीला हे होते उपस्थित…
मंत्रालयात समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्हि.आर. श्रीनिवासन, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. भाऊसाहेब दांगडे, एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, कैलास जाधव यांच्यासह सर्वपक्षीय संघर्ष समितीचे राजेश मोरे, दिपेश म्हात्रे, राजेश कदम, चंद्रकांत पाटील, गजानन पाटील, महेश पाटील, गजानन मंगरूळकर आदींसह जयेश भाग्यवंत महाराज, आर्किटेक्ट राजीव तायशेटे आदी उपस्थित होते.