Home ठळक बातम्या केडीएमसी हद्दीतील गणेशोत्सवासाठीचे मंडप शुल्क माफ करण्याचा निर्णय

केडीएमसी हद्दीतील गणेशोत्सवासाठीचे मंडप शुल्क माफ करण्याचा निर्णय

अग्निशमन परवानगी शुल्कातही 50 टक्के कपात

कल्याण डोंबिवली दि.6 सप्टेंबर :
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी आकारण्यात येणारे मंडप शुल्क रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय केडीएमसी प्रशासनाने घेतला आहे. कल्याण डोंबिवलीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी, पोलीस प्रशासन आणि केडीएमसी अधिकाऱ्यांच्या बैठकीत आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी हा निर्णय जाहीर केला. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे करण्यात आलेल्या प्रमूख मागण्या त्वरेने मंजूर केल्याबद्दल मंडळाच्या प्रमूख पदाधिकाऱ्यांनी आयुक्त डॉ. दांगडे यांचे अभिनंदन केले.

मंडप शुल्क माफ तर अग्निशमन शुल्कात 50 टक्के कपात…
आगामी गणेशोत्सवासाठी मंडप शुल्क आकारणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अग्निशमन दलाच्या परवानगी शुल्कातही 50 टक्क्यांची कपात करण्यात आल्याची माहिती आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी बैठकीत दिली.

सर्व परवानग्या मिळणार प्रभाग क्षेत्र कार्यालयात…
तर सार्वजनिक गणेशोत्सवासाठी आवश्यक असणाऱ्या केडीएमसी, पोलीस, अग्निशमन आदी विभागाच्या आवश्यक त्या परवानग्या एकाच ठिकाणाहून मिळणार आहेत. संबंधित प्रभाग क्षेत्र कार्यालयात यासाठी विशेष एक खिडकी योजना सुरू केली जाणार असल्याचेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

पुढील आठवड्याभरात रस्ते होणार खड्डेमुक्त…
रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरूच आहे. सध्या पाऊस थांबलेला असून पुढील आठवड्याभरात कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावर पडलेले सर्व खड्डे भरले जातील. खड्डे पडलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करून नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून देण्याचा विश्वासही आयुक्त दांगडे यांनी बैठकीत व्यक्त केला.

कृत्रिम तलावातील मूर्तींचे विसर्जनाबाबत…
कल्याण डोंबिवलीत कृत्रीम तलावामध्ये होणाऱ्या गणेशमुर्तींचे सुयोग्य विसर्जन करण्यासाठी यंदाही बारावे येथे सुविधा केली जाणार आहे. विशेष म्हणजे केडीएमसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शन आणि देखरेखीखाली हे विसर्जन केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यासोबतच गांधारी येथील जेट्टी तुटली असून गणेश विसर्जनासाठी महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाकडून रॅम्प बसवला जाणार, शहाड पुलाखाली होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत, कोळी बांधवांच्या विसर्जन शुल्काबाबत कंत्राटदार आणि कोळी बांधव यांच्यात समन्वय साधून उपाय योजना केल्या जाणार असल्याचेही आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले. तर कल्याण डोंबिवलीत केडीएमसीच्या परवानगी शिवाय लागलेल्या कमानी काढून टाकण्याचे आणि परवानगी घेऊन लावलेल्या कमानी ठरलेल्या दिवसांनंतर काढून टाकण्याचे आदेशही त्यांनी या बैठकीत दिले आहेत.

यावेळी कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राकेश मुथा, कल्याण शहर मेळा संघाचे अध्यक्ष रोहन पवार, कार्याध्यक्ष पराग तेली, कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे, वाहतूक शाखेचे एसीपी मंदार धर्माधिकारी, केडीएमसी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, शहर अभियंता अर्जुन अहिरे, जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव यांच्यासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा