कल्याण /डोंबिवली दि.2 मार्च :
कल्याण डोंबिवलीतील रिक्षा स्टँडबाबत (kalyan dombivli) अधिक तक्रारी आल्या असून वाढत्या रिक्षा स्टँडबाबत (auto riksha stand) लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (kdmc commissioner dr. Vijay suryavanshi) यांनी दिली आहे. कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडी (traffic jam) आणि वाहतुकीशी संबंधित इतर महत्वाच्या विषयांवर पालिका मुख्यालयात आज महत्वाची बैठक झाली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
कल्याण डोंबिवलीतील मुख्य रस्त्यांवरील वाहतूकीची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. त्यातही इथल्या रेल्वे स्टेशन (railway station) परिसरातील वाहतूक कोंडी तर सर्वांसाठीच डोकेदुखीचा विषय ठरत आहे. विशेषतः इथल्या रिक्षा स्टँडबाबत सर्वाधिक तक्रारी आल्याचे सांगत लवकरच वाहतूक पोलीस, रेल्वे अधिकारी आणि रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील रिक्षा स्टँडची पाहणी केली जाणार आहे. तर स्टेशन परिसरात या रिक्षांच्या गर्दीमुळे आत जाताना आणि बाहेर पडताना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामूळे नागरिकांना स्टेशनवर सोयीस्करपणे ये-जा करण्याबाबत, मीटरनूसार रिक्षा चालण्याबाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याचेही डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
तसेच कल्याण डोंबिवलीतील पार्किंगसाठी असणारे भूखंड महापालिकेच्या ताब्यात घेण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांशी बोलून लवकरच त्यापैकी योग्य त्या भूखंडांवर पे अँड पार्किंग सुरू केले जाईल. तर आणखी 5 चौकात सिग्नल यंत्रणा सुरू केली जाणार असून त्यापैकी 3 चौकातील सिग्नल व्यवस्थेचे काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर सॅटिस प्रकल्प(satis), रस्त्यावरील साईन एजेस, स्पीडब्रेकर्स, फेरीवाले, विठ्ठलवाडी बस स्टॅण्ड आदी महत्वाच्या विषयांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
या बैठकीला ठाणे वाहतूक विभागाचे डीसीपी बाळासाहेब पाटील, रेल्वेचे एरिया मॅनेजर डॉ. प्रमोद जाधव, कल्याणचे एसीपी अनिल पोवार, कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक सुखदेव पाटील, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.