कल्याण दि.2 मार्च :
गौरीपाडा तलावातील अनेक कासवांचा घातक विषाणूमुळे मृत्यू झाल्याचे कारण वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस ही घटना घडली होती. त्यानंतर मृत कासवांचे नमूने वैद्यकीय तपासणीसाठी विविध प्रयोगशाळांना पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच समोर आला घातक विषाणू या कासवांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे त्यात नमूद करण्यात आला आहे.
कल्याण पश्चिमेच्या गौरीपाडा येथील तलावात 22 जानेवारीला तब्बल 80 हुन अधिक कासव मृत्युमुखी पडल्याची घटना उजेडात आली होती. मात्र त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले नव्हते. त्यासाठी वनविभागाने मृत कासवांचे नमुने शवविच्छेदन आणि तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. या कासवांचे अहवाल प्राप्त झाले असून व्हिसेरा तपासणीत या कासवाचा मृत्यू त्यांच्या पोटात घातक बॅक्टेरिया गेल्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत वन विभागाचे कल्याण वनसंरक्षक आर. एन. चन्ने यांनी सांगितले की मृत कासवांच्या मृत्यूप्रकरणी अहवाल प्राप्त झाला आहे. याबाबत केडीएमसीकडे पत्रव्यवहार करण्यात येणार असून तलावातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी तत्काळ पाऊलं उचलणार असल्याचे स्पष्ट केले.