कल्याण दि.21 मे :
केडीएमसीच्या जलवाहिनीमध्ये मेलेले कबुतर आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण पश्चिमेत समोर आला आहे. पाणी येत नसल्याने करण्यात आलेल्या जलवाहिनीच्या दुरूस्ती कामामध्ये हा प्रकार उघड झाला असून नागरिकांनी केडीएमसीविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
कल्याण पश्चिमेच्या प्रभाग क्रमांक 30 मल्हार नगर परिसरातील सुयोग सोसायटी आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या चार पाच दिवसांपासून पाणी येत नसल्याची तक्रार होती. त्यामुळे आज याठिकाणी केडीएमसी पाणी पुरवठा विभागाकडून संबंधित पाईपलाईन खोदण्यात आली. त्यावेळी या मेन पाईप लाईनवरून सोसायटीला गेलेल्या लाईनचा जोड उघडुन तपासला असता सर्वानाच धक्का बसला. याठिकाणी मेलेल कबुतर अडकून पडल्याने पाणी पुरवठा बंद झाला होता. या कबुतराचा अक्षरशः सांगाडा झाला असल्याचे मनसे विभाग अध्यक्ष कपिल पवार यांनी सांगितले. तसेच याबाबत केडीएमसी पाणी पुरवठा विभागाला तक्रार केली असून या प्रकाराला जबाबदार व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणीही केल्याचे पवार यांनी सांगितले.
दरम्यान हे कबुतर या जलवाहीनीमध्ये कसे आले या प्रश्र्नासोबतच इतके दिवस त्याच जलवाहीनीतील पाणी इतर नागरिकांच्या घरामध्ये प्यायले गेल्याने निर्माण झालेल्या आरोग्याच्या दृष्टीने याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.