Home ठळक बातम्या कल्याणात विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास ; एकीकडे इलेक्ट्रिक डीपी तर दुसरीकडे भला मोठा...

कल्याणात विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास ; एकीकडे इलेक्ट्रिक डीपी तर दुसरीकडे भला मोठा खड्डा

 

कल्याण पश्चिमेच्या टिळक चौक ते तेलवणे हॉस्पिटल रस्त्याची दुरावस्था

कल्याण दि. २५ ऑगस्ट :
कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले असतानाच या खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीमध्ये शेकडो शालेय विद्यार्थी जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. कल्याण पश्चिमेतील टिळक चौक ते तेलवणे हॉस्पिटल मार्गावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
टिळक चौक परिसरात बालक मंदिर शाळेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेबाहेरून गेलेल्या रस्त्याची इतकी दुरवस्था झालीय की त्याला रस्ता तरी का म्हणावा अशी परिस्थिती आहे. या अंतर्गत रस्त्यावर इतके मोठे खड्डे पडले आहेत की त्याला एखाद्या छोट्याशा तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे एकीकडे हे रस्त्यावर साचलेले छोटे तळे आणि दुसऱ्या बाजूला महावितरणचा एक ट्रान्सफॉर्मर आणि लागून दोन डिपी आहेत. नाही म्हणायला रस्त्याच्या कडेला अरुंद असा एक उंचवटा तयार झाला असून रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना याच उंचवट्यावरून जावे लागत आहे. मात्र हा उंचवटा आणि ट्रान्सफॉर्मर, डीपी यामध्ये अवघ्या काही इंचाचे अंतर आहे. परंतू नाईलजास्तव शालेय विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत धरून त्या इलेक्ट्रिक डीपीला चिकटून प्रवास करावा लागतोय.

ही भयंकर वस्तुस्थिती पाहता भविष्यात याठिकाणी एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र ती घडण्याची वाट न पाहता केडीएमसी प्रशासनाने तातडीने हा रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी शाळा प्रशासनासह मुलांच्या पालकांनी केली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा