कल्याण डोंबिवली दि. ७ ऑगस्ट :
यंदा असणाऱ्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशामध्ये हर घर तिरंगा अर्थातच घरोघरी तिरंगा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी केडीएमसीतर्फे कल्याण आणि डोंबिवलीमध्ये सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती.
ज्यामध्ये कल्याण सायकलीस्ट संघ, डोंबिवली सायकलीस्ट संघ आणि हिरकणी महिला सायकलीस्ट संघाचे सायकलपटू , महापालिकेचे कर्मचारी अधिकारी , शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले होते. डोंबिवली ठाकुर्लीला जोडणाऱ्या ९० फूट रस्त्यावर महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत या सायकल रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. कल्याणमध्ये आयोजित सायकल रॅलीचा ही 90 फूटी रस्ता, मेट्रोमॉल, चक्की नाका, ड प्रभाग, वालधुनी पूल, रेल्वे वसाहत पूल, प्रेम ऑटो मार्गे खडकपाडा आणि दुर्गाडी येथे समारोप करण्यात आला. तर डोंबिवलीतील सायकल रॅली ठाकुर्ली 90 फूट रस्ता, सावित्रीबाई फुले कलामंदीर, पेंढारकर कॉलेज, घारडा सर्कल, सर्वेश हॉल, महापालिका कार्यालय, मानपाडा रोड, मार्गे पूर्व पश्चिम उड्डाणपूल, कोपर रोड, सुभाष रोडवरून भागशाळा मैदान येथे या सांगता झाली.
दरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कल्याण डोंबिवलीतील नागरिकांनी येत्या १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा उभारण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी केले.