कल्याणातील प्रतिष्ठित नागरिकांचा स्तुत्य पुढाकार
कल्याण दि.11 डिसेंबर :
अपघातात हातपाय गमवणाऱ्या किंवा जन्मापासूनच दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना पुन्हा आपल्या पायावर उभं करण्यासाठी कल्याणातील प्रतिष्ठीत नागरिकांनी स्तुत्य असा पुढाकार घेत स्तुत्य उपक्रम राबविला. दिव्यांगाबाबत जनजागृती करण्यासह त्यांच्याकरिता निधी जमा करण्यासाठी कल्याणातील बाईकपोर्ट ग्रुपच्या कल्याण ते गोवा सायकल प्रवासाला आजपासून प्रारंभ झाला.
समाजातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय बसवून त्यांच्या आयुष्यात पुन्हा आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम रोटरी क्लबच्या दिव्यांग केंद्रातर्फे चालवले जाते. या दिव्यांग सेंटरला आर्थिक मदत देण्यासाठी कल्याणातील बाईकपोर्ट सायकल क्लबचे सायकलिस्ट एकत्र आले आणि त्यांनी कल्याण ते गोवा असा तब्बल 550 किलोमीटरचा प्रवास सायकलने गाठण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार आज कल्याण पश्चिमेच्या दुर्गाडी किल्ल्यापासून 15 सायकलिस्टनी या प्रवासाला प्रारंभ केला. यामध्ये डॉक्टर, वकील, पोलीस अधिकारी, उद्योजक, इंडियन नेव्ही आदी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश आहे. तत्पूर्वी केडीएमसीचे सचिव संजय जाधव यांच्या उपस्थितीत या सायकलिस्टतर्फे रोटरी दिव्यांग सेंटरला 5 लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यातून 100 हून अधिक लोकांना कृत्रिम हातपाय बसवण्यात येणार असल्याची माहितीही रोटरी क्लबतर्फे देण्यात आली.
तर गेल्या काही वर्षांपासून आम्ही एक सामाजिक थीम घेऊन त्याच्या जनजागृतीसाठी दुसऱ्या राज्यात सायकल प्रवास करीत असल्याची माहिती यावेळी नितीन सूर्यवंशी या सायकलिस्टने दिली. तर पुढील 5 दिवसांत हे सायकलिस्ट सागरी किनाऱ्यामार्गे प्रवास करून गोव्याला जाणार असल्याचे डॉ. रेहनुमा यांनी सांगितले.