डोंबिवली दि.6 फेब्रुवारी :
राहत्या घराला मालमत्ता कराची आकारणी करण्याच्या बदल्यात 50 हजाराची लाच स्वीकारताना केडीएमसीच्या विद्यमान कर्माचाऱ्यासह निवृत्त कर्मचाऱ्याला ठाणे अँटी करप्शनच्या पथकाने ह प्रभाग क्षेत्र कार्यालयात रांगेहाथ पकडले.
योगेश महाले (विद्यमान कर्मचारी) आणि सूर्यभान कर्डक (निवृत्त कर्मचारी) अशी या दोघांची नावे आहेत. घराला मालमत्ता कराची आकारणी करण्यासाठी डोंबिवली पश्चिमेतील एका नागरिकाने तत्कालीन कर्मचारी कर्डक याला पैसे दिले होते. मात्र तरीही करआकारणी झाली नसल्याने संतापलेल्या तक्रारदाराने याबाबत जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यावर आता आपण निवृत्त झालो असल्याने संबधित अधिकाऱ्यांना परत पैसे द्यायला लागतील अशी बतावणी केली. आणि संबंधित व्यक्तीकडे पुन्हा 50 हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
त्यावर आज दुपारी निवृत्त कर्मचारी कर्डकच्या वतीने या 50 हजारांची लाच स्वीकारताना योगेश महालेला ठाणे अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यामुळे केडीएमसीमध्ये खळबळ उडाली आहे.