४० हून अधिक विकासकांचे १५० हून अधिक होम प्रोजेक्ट होणार सादर
कल्याण दि.३१ मार्च :
गेल्या दशकभरापेक्षा अधिक काळापासून ग्राहकांना गुणवत्तापूर्ण आणि आवाक्यातील घरं उपलब्ध करून देणारी बांधकाम व्यावसायिकांची संघटना म्हणजे क्रेडाई एमसीएचआय. या संघटनेच्या कल्याण-डोंबिवली शाखेतर्फे यंदाही ६ ते ९ एप्रिल दरम्यान प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. कल्याण पश्चिमेच्या लालचौकी जवळील वासुदेव बळवंत फडके मैदानात हे भव्य प्रदर्शन होत असून यंदा या प्रदर्शनाचे १२ वे वर्ष आहे.
४० हून अधिक विकासक त्यांचे १५० हून अधिक गृह प्रकल्प…
या प्रदर्शनात बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, शिळफाटा परिसरातील ४० हून अधिक विकासक त्यांचे १५० हून अधिक गृह प्रकल्प या प्रदर्शनात मांडणार आहेत. चार दिवसाच्या कालावधीत कल्याण परिसरासह मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रातील सुमारे २५ हजाराहून अधिक नागरिक घर खरेदीसाठी या प्रकल्पाला भेट देतील. १६ लाखापासून ते एक कोटी किमतीची घरे या प्रदर्शनात असतील.
कल्याण-डोंबिवली, टिटवाळा परिसरात उपलब्ध होत असलेल्या विविध नागरी सुविधांची माहिती इतर शहरातील नागरिकांना व्हावी, हाही या प्रदर्शनाचा उद्देश असल्याचे प्रकल्प समन्वयक दिनेश मेहता यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार…
‘सकाळी ११ ते रात्री नऊ या कालावधीत हे प्रदर्शन नागरिकांकासाठी खुले असणार आहे. प्रदर्शनाला चार दिवसांच्या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार असल्याची माहिती ‘एमसीएचआय’चे माजी अध्यक्ष रवी पाटील यांनी दिली. यावेळी ‘एमसीएचआय’ कल्याण-डोंबिवली शाखेचे अध्यक्ष भरत छेडा, सचिव अरविंद वरक, राहुल कदम, सुनील चव्हाण उपस्थित होते.
आवाक्यातील किमतीत घर खरेदी करण्याची संधी…
अनेक नागरिकांना घर खरेदी करण्याची इच्छा असते. पण मुंबई परिसरातील घर खरेदी करणे त्यांना तेथील किमतीमुळे शक्य होत नाही. काही नागरिक मुंबई शहर परिसरात आपले दुसरे घर असावे या उद्देशाने घर खरेदीच्या प्रयत्नात असतात. अशा नागरिकांना मुंबईपासून ४५ ते ५५ मिनिटाच्या अंतरावरील कल्याण-डोंबिवली, टिटवाळा शहर परिसरात त्यांच्या आर्थिक आवाक्यातील किमतीत घर खरेदी करण्याची संधी मिळावी हाही या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले.
कल्याण, डोंबिवली शहरांचेही होणार ‘मार्केटिंग’…
तर कल्याण डोंबिवली शहर परिसरात उड्डाण पूल, मेट्रो, जलवाहतूक, उन्नत मार्ग, नवीन प्रस्तावित रस्ते, पूल होत आहेत. दळणवळणाचे मोठे केंद्र येत्या काळात हे शहर असणार आहे. या प्रकल्पांची माहिती नागरिकांना व्हावी आणि कल्याण, डोंबिवली शहरांचे ‘मार्केटिंग’ या व्हावे हा दुहेरी उद्देश या प्रदर्शनाचा असल्याचे रवी पाटील यांनी स्पष्ट केले.
विविध मान्यवरांची उपस्थिती….
प्रदर्शनात घराची नोंदणी करणाऱ्या नागरिकांना घर खरेदीत सूट देण्यात येणार आहे. प्रसिध्द अभिनेते श्रेयस तळपदे या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. तसेच, केंद्रीय मंत्री कपील पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे, आ. विश्वनाथ भोईर, पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे या प्रदर्शनाला भेट देणार आहेत.