
टिटवाळा दि.29 एप्रिल :
अनधिकृत बांधकामांचे माहेरघर अशी टीका केली जाणाऱ्या टिटवाळ्याच्या बनेली भागामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर केडीएमसी प्रशासनाने मोठी कारवाई केली. येथील बल्याणी परिसरात सुरू असलेल्या फाउंडेशनसह तयार रूम केडीएमसीच्या अ प्रभाग क्षेत्र कार्यालयाकडून जमीनदोस्त करण्यात आल्या. (Crackdown on unauthorized constructions in Titwala continues; 167 cement concrete foundation floors with ready-made rooms demolished)
येथील अ प्रभाग क्षेत्र कार्यालयअंतर्गत असलेल्या बल्याणी येथे सुरू असलेले सिमेंट काँक्रीटचे 167 दगडी फौंडेशनचे बांधकाम तसेच 3 तयार रूमच्या अनधिकृत बांधकामांवर आज अ प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निष्कसनाची कारवाई करण्यात आली. 2 जेसीबी मशीन, ठेकेदारांची 15 माणसे, पोलीस कर्मचारी वर्ग, वरिष्ठ लिपिक आणि महापालिका कर्मचारी यांच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. तर या कारवाईच्या वेळी स्थानिक नागरिकांकडून प्रचंड विरोध केला जात असतानाही कारवाई पूर्ण करण्यात आल्याची माहिती प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील यांनी दिली.