Home ठळक बातम्या कोवीडने केडीएमसी प्रशासनाला सकारात्मक मानसिकता दिली – डॉ.विजय सुर्यवंशी

कोवीडने केडीएमसी प्रशासनाला सकारात्मक मानसिकता दिली – डॉ.विजय सुर्यवंशी

केडीएमसीच्या कोवीड लढ्यावरील कॅप्टन कूल पुस्तकाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण दि.2 एप्रिल :
कोवीडशी यशस्वी लढा देण्यासोबतच आम्ही शहर विकासासाठीही अक्षरशः झपाटल्याप्रमाणे काम करू शकलो. हे केवळ आपल्या एकट्यामुळे नव्हे तर महापालिकेच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यामुळे शक्य झाले. कोवीडने केडीएमसी प्रशासनाला कामं करण्याची सकारात्मक मानसिकता दिल्याची प्रांजळ कबुली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त आणि तत्कालीन केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिली. केडीएमसीच्या कोरोना लढ्यावर आधारित गौतम कोतवाल लिखित कॅप्टन कूल कूल पुस्तकाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कल्याणच्या के.सी. गांधी शाळेच्या सी.एम. गांधी ऑडीटोरियममध्ये झालेल्या या दिमाखदार सोहळ्याला शहरातील अनेक मान्यवर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि केडीएमसी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

कोवीड लढ्यावरील हे पुस्तक सर्वांसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरेल…
महाराष्ट्रात कोवीडचा सर्वात पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीत दगावला. मात्र त्यानंतरही हिंमत न हारता आम्ही तत्काललीन पालकमंत्री आणि विद्यमान मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कमी वेळात जंबो कोवीड हॉस्पिटल उभारून एकही रुग्ण उपचाराशिवाय राहणार नाही याची खबरदारी घेतली. सर्वाधिक रुग्ण असूनही कल्याण डोंबिवलीचा मृत्युदर मात्र कमी ठेवण्यात आम्हाला यश मिळाल्याचे समाधान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. तर कल्याण डोंबिवलीतील खासगी डॉक्टरांनी कोवीड काळात डॉक्टर आर्मीच्या माध्यमातून दिलेले योगदान तर विसरले जाऊ शकत नाही. त्यामुळे कोवीड लढ्यावरील हे पुस्तक सर्वांसाठी नक्कीच एक प्रेरणास्त्रोत ठरेल असा विश्वासही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

डॉक्टर आर्मीसाठी कोवीड काळ म्हणजे कटू – गोड आठवणी…
कोवीडने आपल्याला भरपूर काही शिकवले. समोर कितीही मोठा शत्रू किंवा संकट असेल तरी आपण सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न केल्यास त्याला नक्कीच हरवू शकतो हा विश्वास कोवीडने दिल्याची भावना डॉक्टर आर्मीचे प्रमूख आणि इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. कोवीड काळात आम्ही अनेक गोड आणि कटू आठवणींचा अनुभव घेतला. या काळात आम्ही हजारो रुग्णांचा जीव वाचवू शकलो याचा नक्कीच आनंद आहे. मात्र त्याचवेळी आमच्यातील काही डॉक्टरांचे झालेले निधन हे मनाला चटका लावणारे ठरले असे सांगताना डॉ. पाटील काहीसे भावूक झाले होते.

कोवीड काळातील लढ्याचे पुस्तकात वर्णन…
‘कॅप्टन कूल कल्याण डोंबिवली महापालिकेचा करोना विरोधी लढा’ हे पुस्तक ग्रीन वर्ल्ड प्रकाशनाचे गौतम कोतवाल यांनी लिहिले आहे. कोवीड काळात तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी कल्याण डोंबिवलीतील खासगी डॉक्टर, सामाजिक संस्था आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने कशाप्रकारे आरोग्य यंत्रणा उभारून कोवीडला हरवले याचे यथार्थ वर्णन या पुस्तकात करण्यात आले आहे.

तिघाही मान्यवरांचा प्रातिनिधिक नागरी सत्कार…

दरम्यान कोवीड काळात दिलेल्या सेवेबद्दल कल्याण नागरी सत्कार समितीतर्फे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे , डॉ. विजय सुर्यवंशी आणि डॉ. प्रशांत पाटील यांचा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रा. अशोक प्रधान, बिर्ला कॉलेजचे संचालक डॉ. नरेश चंद्रा, के.सी. गांधी शाळेचे ट्रस्टी मनोहर पालन, कल्याण शहर व्यापारी संघटनेचे विजय पंडीत आदी मान्यवर व्यक्तींच्या हस्ते हा प्रातिनिधिक नागरी सत्कार करण्यात आला.

पुस्तक प्रकाशनाच्या या कार्यक्रमाला आमदार विश्वनाथ भोईर, कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाण्याचे जॉइंट सी पी दत्तात्रय कराळे, केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, सांगली मिरज महापालिका आयुक्त सुनिल पवार, ॲड. निहार ठाकरे, डी सी पी सचिन गुंजाळ, डॉ. आरती विजय सुर्यवंशी, सचिव संजय जाधव, माजी सभागृह नेते रवी पाटील, स्थायी समिती माजी सभापती दिपेश म्हात्रे, विकास म्हात्रे, राहुल दामले यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा