कोवीड लसीकरणासाठी कल्याण डोंबिवली महापालिका सज्ज
कल्याण दि.8 जानेवारी :
कोवीड लसीकरणासाठी देशपातळीवर यंत्रणा सज्ज झाली असून आज महाराष्ट्रात 25 महापालिका क्षेत्रामध्ये या लसीकरणाची ‘ड्रायरन’ घेण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण आणि डोंबिवलीमध्येही 2 ठिकाणी याची ड्रायरन (रंगीत तालीम) आज पार पडले.
गेल्या मार्चपासून सर्वत्र धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनावर मात करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून लसीकरणासाठी शासकीय यंत्रणांनी कंबर कसली आहे. देशात कोवीड विरोधातील 2 लसीना केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर लसीकरणाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यामध्ये आज 25 महापालिका क्षेत्रात कोवीड लसीकरणाचा ड्रायरन घेण्यात आला. केडीएमसीच्या कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी नागरी आरोग्य केंद्रात आणि डोंबिवलीतील पाटकर आरोग्य केंद्रामध्ये हे ड्रायरन घेण्यात आले. याठिकाणी 25 जणांना प्रातिनिधिक स्तरावर हा तयारीचा प्रयोग करण्यात आला. एनवेळेला शासकीय कर्मचारी गोंधळून जाऊ नये, लसीकरणादरम्यान येणाऱ्या त्रुटी आधीच लक्षात याव्यात या उद्देशाने हा ड्रायरन घेण्यात आला. या लसीकरणाबाबत जनजागृतीही केली जाणार असून दिवसाला 100 लोकांना लस देण्याचा प्रयन्त असेल अशी माहिती केडीएमसी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिली