
कल्याण दि.30 मार्च :
कल्याण – मुरबाड -नगर महामार्गावर रायते गावाजवळ पहाटेपासून भलामोठा कंटेनर बंद पडल्याने मोठी वाहतूक कोंडी होत आहे. पहाटेपासून बंद पडलेला हा कंटेनर बाजूला करण्यासाठी एवढे तास उलटूनही कोणत्याच शासकीय यंत्रणेकडून काहीही प्रयत्न केले न गेल्याबाबत वाहन चालक तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत आहे. तर रायते गावातील युवक ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटेच्या सुमारास कल्याण- मुरबाड मार्गावरील रायते गावाजवळ हा कंटेनर तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडला. रस्त्याच्या मधोमध हा कंटेनर बंद पडल्याने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. यातच संबंधित वाहन चालक सकाळी अकरा वाजल्यापासून बेपत्ता असल्याची माहितीही स्थानिकांनी दिली.
संध्याकाळीही हा कंटेनर तसाच रस्त्यात उभा असल्याने वाहतुकीला त्याचा फटका बसलेला पाहायला मिळाला. दरम्यान स्थानिक रायते गावातील युवकांनी इथली वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे दिसून येत आहे. त्यातच नगरहून कल्याणकडे येणारी एसटी बसचा टायर पंक्चर झाल्यानेही या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या डोकेदुखीत भर पडली आहे.
माहिती, फोटो सौजन्य- राम नामदेव सुरोशी, रायते