केडीएमसी आयुक्तांची घेतली भेट
कल्याण दि.26 जुलै :
कल्याण पूर्वेतील वालधुनी शिवाजीनगर परिसरातील नागरिक आणि नोकरदारांच्या सोयीसाठी तात्काळ फूट ओव्हर ब्रीज उभारावा अशी मागणी शिवसेना कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भात निलेश शिंदे यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख मल्लेश शेट्टी आणि माजी नगरसेवक प्रमोद पिंगळे यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांची भेट घेतली. (Construct a footover bridge immediately for the convenience of the citizens of Kalyan East)
कल्याण पूर्वेतील वालधुनी – छत्रपती शिवाजी महाराज नगर भागातील नागरिकांना विठ्ठलवाडी स्टेशन जवळचे असल्याने रेल्वे रूळालगत असलेल्या पाऊल वाटेने ते जीव धोक्यात घालून प्रवास करत होते. मात्र काही दिवसापासून सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेने हा रस्ता बंद केल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. विठ्ठलवाडी स्टेशनला जाण्यासाठी एक तर आनंदवाडी येथे रेल्वेरूळ ओलांडून येऊन रिक्षाने जावे लागते. किंवा थेट विठ्ठलवाडी स्टेशनला रिक्षाने जायचे म्हटले तर नागरिकांना १०० रुपयांचा भुर्दंड पडतो. नागरिकांची ही अडचण अशोकनगर, वालधुनी येथील काही प्रवाशी मंडळी आणि माजी नगरसेवक प्रमोद पिंगळे यांनी शिवसेना कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख निलेश शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मल्लेश शेट्टी यांच्या निदर्शनास आणून दिली.
यासंदर्भात वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपलिका आयुक्त इंदुराणी जाखड यांची भेट घेऊन नागरिकांची ही अडचण लक्षात आणून दिली.
त्यावर केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लगेचच संबंधित अधिका-यांना या कामाच्या सूचना दिल्या. आणि पुढील महिनाभरात या कामाला लवकर सुरुवात करण्याबाबत निर्देशित केले.
अशोकनगर – वालधुनी येथील नागरिकांची सुरक्षा आणि जिव्हाळ्याचा हा विषय लवकरात लवकर मार्गी लावून त्यांना कायमस्वरूपी सुरक्षित असा रस्ता उपलब्ध झाल्यास नागरिकांच्या वेळ आणि पैशाची बचत होणार असल्याचे शिवसेना कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांनी सांगितले.