Home ठळक बातम्या कल्याणात झाला संविधान अमृत महोत्सवी सोहळा ; केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार...

कल्याणात झाला संविधान अमृत महोत्सवी सोहळा ; केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार विश्वनाथ भोईर यांची प्रमूख उपस्थिती

कल्याण दि.27 ऑक्टोबर :
भारतीय संविधानाच्या 75 व्या म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कल्याणात संविधान अमृत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. युनायटेड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रदीप जगताप यांच्यातर्फे आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर, ज्येष्ठ विचारवंत किरण सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (Constitution Amrit Jubilee Ceremony held in Kalyan; Union Minister Ramdas Athawale, MLA Vishwanath Bhoir prominent presence)

जगभरामध्ये भारतीय संविधान आणि त्याचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास केला जातो. जगातील सर्वात मोठी यशस्वी लोकशाही व्यवस्था उभारण्याचे काम या संविधानामुळे झाले आहे. तसेच देशातील सामान्य नागरिकांपासून ते सर्वोच्च व्यक्तीला या संविधानाने समान अधिकार बहाल केल्याचे गौरवोद्गार यावेळी प्रमुख पाहुण्यांकडून काढण्यात आले. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कार्यक्रमाचे आयोजक डॉ. प्रदीप जगताप यांच्या कार्याचे कौतुक करत जगभरात सुरू असलेल्या त्यांच्या कामाचा आपल्या भाषणात गौरवही केला. तर या संविधानामुळेच आपण आमदार झालो, या संविधानामुळे आपण एवढ्या पुढे गेल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी सांगितले.

तर या कार्यक्रमाला उपस्थित प्रत्येक व्यक्तीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची एक प्रत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आली. तर माता रमाबाई आंबेडकर यांच्या पहिल्या वहिल्या भव्य पूतळ्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल युनायटेड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट फाऊंडेशनकडून आमदार विश्वनाथ भोईर यांचे मनापासुन आभार मानण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे प्रमूख पाहुणे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना डॉ. प्रदीप जगताप यांच्या हस्ते मानद डॉक्टरेटही प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार विश्वनाथ भोईर, शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील, रिपाईचे ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे, बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ . प्रदीप जगताप, संस्थेचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह बाळाराम जाधव, अजय सावंत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा