डोंबिवली दि.६ जुलै :
एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बहुमताने निवड झाल्याबद्दल डोंबिवलीत शिंदे समर्थकानी आज जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. ढोल ताशा, बँजो आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये शिंदे समर्थकांनी जल्लोष केल्याचे दिसून आले. तर जल्लोष साजरा करण्यापूर्वी शिंदे समर्थकांनी श्री गणेश मंदिरामध्ये दर्शन घेऊन मुख्यमंत्र्यांची कारकीर्द यशस्वी होण्यासाठी साकडे घातले.
बहुमताच्या जोरावर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल डोंबिवलीतील फडके रोड ते इंदिरा चौक दरम्यान ही भव्य रॅली काढण्यात आली होती. विशेष म्हणजे या रॅलीत डोंबिवलीतील शिवसेनेचे १२ ते १५ माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी एकनाथ शिंदे समर्थक नगरसेवक पदाधिकऱ्यांनी ढोल ताशा बँजोच्या ठेक्यावर डान्स करत आपला आनंद व्यक्त केला. या रॅलीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी डोंबिवलीत जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याचे पाहायला मिळालं.
तर राज्याच्या राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदाचा बहुमान लाभला आहे. डोंबिवलीमधील आम्ही शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.