Home कोरोना लसीकरणावरून कल्याणात नागरिकांचा गोंधळ आणि संताप; कुपनचा काळा बाजार झाल्याचा आरोप

लसीकरणावरून कल्याणात नागरिकांचा गोंधळ आणि संताप; कुपनचा काळा बाजार झाल्याचा आरोप

 

कल्याण दि.11 ऑगस्ट :
एकीकडे 15 ऑगस्टपासून दोन लस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळाल्याने केडीएमसीच्या कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिर लसीकरण केंद्रावर आज तोबा गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. मात्र या गर्दीच्या नियोजनासाठी केडीएमसी प्रशासनाकडून किंवा ज्या खासगी एजन्सीला लसीकरणाचे कंत्राट देण्यात आले आहे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त करण्यात आला.

विशेष म्हणजे लस घेण्यासाठी अनेक जण काल रात्रीपासून तर काही जण पहाटेपासून रांगेत उभे होते. ही रांग सुमारे दिड ते दोन किलोमीटरपर्यंत मोठी होती. यावरूनच लसीकरणासाठी आज उसळलेल्या लोकांच्या संख्येचा अंदाज येऊ शकतो. रांगेमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक सर्वच जण लस घेण्यासाठी उभे होते.

तर लस घेण्यासाठी पहाटे 3 वाजल्यापासून रांगेत उभे राहूनही लसीचे टोकन न मिळाल्याने संतप्त झालेल्या सोनाली पाठारे या तरुणीने लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलेले पाहायला मिळाले. तसेच कुपन वाटण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेत एवढ्या लवकर कुपन कसे काय संपले असा संतप्त सवाल उपस्थित केला. या नागरिकांचा संताप पाहता अखेर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मग लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. एवढा सगळा गोंधळ सुरू असताना हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पालिका मुख्यालयातून केडीएमसीचा एकही अधिकारी याठिकाणी उपस्थित नव्हता. सगळा गोंधळ शांत झाल्यावर आणि गर्दी ओसरल्यावर मग पालिकेच्या उपायुक्त पल्लवी भागवत यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तर लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी आमच्याकडून नागरिकांना योग्य त्या सूचना दिल्याचे आणि कुपन व्यवस्थितपणे वाटले गेल्याचा दावा यावेळी केला.

दरम्यान राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच 15 ऑगस्टपासून 2 लस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची घोषणा केली आहे. त्यामुळे साहजिकच लस घेण्यासाठी लोकांची गर्दी उसळणार हे स्पष्ट होते. मात्र त्यानंतरही केडीएमसी प्रशासनाकडून लसीकरण केंद्रावर कोणत्याही प्रकारचे नियोजन आढळून आले नाही. ज्याची प्रचिती अत्रे रंगमंदिर लसीकरण केंद्रावर घडलेल्या गोंधळातून आज पुन्हा एकदा आली. यातून केडीएमसी प्रशासन कधी आणि कसा धडा घेणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

पल्लवी भागवत, उपायुक्त :
आपल्याला काही वेळापूर्वीच या गोंधळाची माहिती समजली. एकंदर परिस्थिती पाहता यापूढे आता केडीएमसीचा एक अधिकारी नियुक्त केला जाईल. तसेच नागरिकांना सूचना देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल अशी प्रतिक्रिया केडीएमसी उपायुक्त डॉ. पल्लवी भागवत यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा