Home ठळक बातम्या खोणी ते काटई नाका दुसऱ्या मार्गाचेही लवकरच काँक्रीटीकरण होणार – खासदार डॅा....

खोणी ते काटई नाका दुसऱ्या मार्गाचेही लवकरच काँक्रीटीकरण होणार – खासदार डॅा. श्रीकांत शिंदे

 

23 कोटी 49 लाखांच्या निधीला मंजुरी

कल्याण दि. 22 डिसेंबर :
काटई नाका ते खोणी या राज्य मार्गावरील एका मार्गिकेचे काँक्रीटीकरण जवळपास पूर्ण होत आले असून त्यामुळे या भागातील वाहतुकीचा वेग वाढला आहे. त्याचवेळी काटईकडे जाणाऱ्या मार्गिकेची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून त्याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन यांच्याकडे रस्त्याच्या उभारणीसाठी मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत एमआयडीसी प्रशासनाने या रस्त्याच्या दुसऱ्या मार्गिकेला मंजुरी दिली असून 23 कोटी 49 लाखांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्याची दुसरी मार्गिकाही लवकरच पूर्ण होणार असून खोणी ते काटई नाका मार्गावरील प्रवाशांचा मार्ग सुकर होणार असल्याची माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण आणि अंबरनाथ तालुक्‍यांच्या वेशीवर असलेल्या परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. गेल्या काही वर्षात येथे उपलब्ध झालेल्या विविध पायाभूत सुविधांमुळे मुंबई आणि उपनगरातील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर स्थायिक होण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे काटई – कर्जत राज्य मार्गाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्याची गेल्या काही वर्षात दुरावस्था झाली होती. या रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण होण्यासाठी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नाने 2018 मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने काटई ते खोणी या पहिल्या टप्प्यातील रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाच्या कामाला मंजुरी दिली. आता या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून रस्त्याचा बहुतांश भाग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. खोणीकडे जाणारी एक मार्गिका खुली झाल्याने काटई नाका ते खोणीपर्यंतचा प्रवास वेगवान झाला आहे. इथल्या दुसऱ्या मार्गिकेच्या कामासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमआयडीसी प्रशासनाकडे निधीची मागणी केली होती.
या कामासाठी २३.४९ कोटीच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्याचे कामही लवकरच सुरू होणार असून रस्त्याच्या कामाची ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून लवकरच कामाला सुरुवात केली जाईल अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

नेवाळी नाकाही कोंडीमुक्त होणार
काटई कर्जत राज्य महामार्गावर सर्वाधिक वर्दळीचा असलेला नेवाळी नाकाही लवकरच कोंडीमुक्त होणार आहे. या नाक्याची कोंडी फोडण्यासाठी स्वतंत्र कामाला मजुरी देण्यात आली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा