खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांतून आतापर्यंत सुमारे १ हजार कोटींचा निधी मंजूर
कल्याण – डोंबिवली दि. २५ ऑगस्ट :
शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही कॉंक्रिट रस्त्यांचे जाळे विणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने आणखी आठ गावांचे जोडरस्ते कॉंक्रिटचे केले जाणार आहेत. उसरघर, निळजे, घेसर, कोळे, हेदूटणे, माणगाव आणि भोपर या गावांना जोडणाऱ्या चार रस्त्यांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तब्बल ३२६ कोटींची निविदा जाहीर केली आहे.
आतापर्यंत १ हजार कोटींचा निधी मिळवण्यात यश…
यामध्ये उसरघर – निळजे – घेसर या रस्त्याच्या कामासाठी १०७.१४ कोटींची, निळजे – कोळे – हेदूटणे आणि उसरघर – घारीवली या दोन रस्त्यांसाठी १२३.४९ कोटी तर हेदूटणे – माणगाव – भोपर या रस्त्यासाठी ९५.९९ कोटी रूपयांची निविदा एमएमआरडीएच्या वतीने मंजूर करण्यात आली आहे. यापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांसाठी ३६० कोटी, औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांसाठी १०० कोटी तर इतर रस्त्यांसाठी २०० हुन अधिक कोटी असे सर्व मिळून कल्याण लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत सुमारे १ हजार कोटींचा निधी मिळवण्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना यश आले आहे.
शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील रस्त्यांचे मजबुतीकरण…
कल्याण लोकसभा मतदारसंघात शहरी भागासह ग्रामीण भागाचाही तितकाच समावेश आहे. त्यामुळे शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्नशील आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम अशा विविध विभागांमधून कोट्यवधींचा निधी कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी उपलब्ध झाला आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे विकसीत केल्यास त्याचा गावांना फायदा होऊन गावांचा विकास होण्यात मोठी मदत होईल. या उद्देशाने ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी मोठा निधी उपलब्ध केला जातो आहे.
निविदा प्रक्रिया पूर्ण होताच तातडीने कामाचे कार्यादेश…
यासोबतच कल्याण शहराच्या वेशीवर असलेल्या अनेक गावांमध्ये रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाची आवश्यकता होती. त्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएकडे निधीची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी एमएमआरडीएच्या वतीने ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी निधीही मंजूर झाला होता. एमएमआरडीएच्या वतीने नुकतीच या रस्त्यांसाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे. यात उसरघर, निळजे, घेसर, कोळे, हेदूटणे, माणगाव आणि भोपर या आठ गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचा यात समावेश आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच तातडीने कामाचे कार्यादेश दिले जाणार असून कामालाही लवकरच सुरूवात केली जाईल, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.
खासदार डॉ. शिंदे यांच्यामार्फत रस्त्यांसाठी आतापर्यंत १ हजार कोटीचा निधी उपलब्ध…
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र – ३६० कोटी
डोंबिवलीतील औद्योगिक क्षेत्र – १०० कोटी
इतर रस्त्यांसाठी – २०० कोटी
आता ग्रामीण रस्त्यांसाठी – ३२६ कोटी