कल्याण दि.27 ऑक्टोबर :
भाजप कार्यकत्यांबाबत पोलिसांकडून दूजाभाव केला जात असल्याचे गाऱ्हाणे भाजपच्या कल्याण जिल्हाध्यक्षांनी राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी आपण त्यांना याबाबत सांगितल्याची माहिती भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.(Concerned about BJP workers from police administration – Complaint of BJP District President to Deputy Chief Minister Devendra Fadnavis)
कल्याणच्या वडवली भागात भाजपच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झाला असून याप्रकरणी पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तींविरोधात तक्रार दाखल आहे. मात्र त्यानंतरही पोलीस आरोपीला अटक करत नाही. तसेच पोलिस प्रशासन भाजप कार्यकर्त्यांबाबत दूजाभाव करत असल्याचे आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी यांनी सांगितले.
त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण याप्रकरणी लक्ष घालू असे आश्वासित केल्याचेही सूर्यवंशी यांनी यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले.
त्यासोबतच डीपीडीसी बैठकीत भाजपचे नगरसेवक, आमदार यांना विकासकामांसाठी निधी उपल्ब्ध करून द्यावा अशी मागणीही जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यावेळी केली आहे. यावेळी आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, शशिकांत कांबळे, अभिमन्यू गायकवाड आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.