Home क्राइम वॉच अनधिकृत बांधकामप्रकरणी अधिकाऱ्यांविरोधात अँटी करप्शनकडे तक्रार; तर दोषी असल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचा केडीएमसी...

अनधिकृत बांधकामप्रकरणी अधिकाऱ्यांविरोधात अँटी करप्शनकडे तक्रार; तर दोषी असल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचा केडीएमसी आयुक्तांचा पवित्रा

 

कल्याण दि.16 सप्टेंबर :
बेकायदा बांधकामावरील कारवाईप्रकरणी केडीएमसी अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचे खळबळजनक आरोप करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाने आता थेट अँटी करप्शनकडे धाव घेत याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे असून अनधिकृत बांधकामांवरील कारवाईत प्रशासनाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया केडीएमसी आयुक्तांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी डोंबिवली पूर्वच्या दावडी परिसरात असणाऱ्या 6 मजली अनधिकृत इमारतीवर केडीएमसीने कारवाई केली होती. या कारवाईनंतर ही इमारत बांधणाऱ्या मुन्ना सिंगने या कारवाईवर संताप व्यक्त करत ती न पाडण्यासाठी केडीएमसी अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचा खळबळजनक आरोप केला. तसेच केडीएमसी अधिकारी दिपक शिंदे आणि अनंत कदम यांनी प्रत्येकी 1 लाख रुपये स्वत: साठी आणि केडीएमसी आयुक्तांच्या नावे 25 लाख घेतल्याचा गंभीर आरोप मुन्ना सिंगने करत अधिकाऱ्यांसोबत हॉटेलमध्ये चर्चा करीत असल्याचा एक सीसीटीव्हीही सादर केला.

दरम्यान या सर्व प्रकरणाची केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्तांकडून चौकशी सुरू आहे. मात्र त्यावर मुन्ना सिंगने नाराजी व्यक्त करत अँटी करप्शन विभागाकडे धाव घेत याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी करत दोन्ही अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

तर याप्रकरणी केडीएमसी प्रशासनाची बाजू जाणून घेतली असता अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषी आढळल्यास कारवाई अटळ असल्याचे केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत बांधकामांविरोधात केडीएमसीने मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे ही अनधिकृत बांधकामे करणाऱ्या समाज कंटकांचे धाबे दणाणले असून अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरणाचा प्रकार असल्याचेही आयुक्त सूर्यवंशी म्हणाले. मात्र अशा दबावाला कोणतीही भीक न घालता कारवाई सुरूच राहणार असल्याचे डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा