राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कल्याण लोकसभेत सर्वाधिक मताधिक्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील, उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांचा विश्वास!
डोंबिवली दि.7 एप्रिल:
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आणि कल्याण लोकसभेत रेकॉर्डब्रेक कामे झाली असून ही कामे महायुतीतील तिन्ही घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी काम करावे, असे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केले. डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेस कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी मेळाव्यात खासदार शिंदे बोलत होते.
मतदारसंघाचा १० वर्षात अक्षरशः कायापालट
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहेत. त्यामुळे भविष्यात सर्वांना ताकद देण्याचे काम मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून केले जाईल, असा विश्वास खासदार शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. कल्याण लोकसभेचा मागील १० वर्षात अक्षरशः कायापालट झाला असून गल्लोगल्ली विकास कामे सुरू आहेत. ही कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी महायुतीच्या तीनही घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची असल्याचे मतही यावेळी खासदार शिंदे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतील…
तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा असून कल्याण लोकसभेत राज्यातीलच नव्हे, तर देशातील सर्वाधिक मताधिक्य मिळावे, यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना यंदा आपली लढाई दुसऱ्या कोणाशी नसून आपल्याशीच आहे, कारण आपल्याला मतदानाची टक्केवारी वाढवून महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणायचे असल्याचे आवाहन भाजपाचे कल्याण लोकसभा प्रचारप्रमुख शशिकांत कांबळे यांनी केले.
डोंबिवली जिमखाना येथे पार पडलेल्या या पदाधिकारी बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस रमेश हनुमंते, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे, प्रदेश सरचिटणीस सुभाष गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे, भाजपाचे कल्याण लोकसभा प्रचारप्रमुख शशिकांत कांबळे, नंदू परब यांच्यासह पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.