कल्याणातील वाचनप्रेमी कदम कुटुंबीयांचा स्तुत्य उपक्रम
कल्याण दि.17 ऑगस्ट :
कल्याणातील वाचनप्रेमी कुटुंबाने नव्या संस्थेच्या कार्यालय उद्घाटनासाठी राबवलेल्या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक केले जात आहे. वाचनप्रेमी विशाल कदम आणि त्यांच्या कुटुंबियांनी समाजातील सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या हस्ते आपल्या कार्यालयाचे उद्घाटन करत सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला.
विशाल कदम आणि त्यांचे कुटुंबिय हे कल्याण शहरात वाचन चळवळ रुजवण्यासाठी सुपरिचित आहेत. युवा पिढीला करिअर आणि भविष्यातील संधींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विशाल कदम यांनी ट्यूटेलेज संस्थेची स्थापना केली आहे. कल्याण पूर्वेतील मेट्रो प्लाझा मॉलमध्ये या संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून करण्यात आले. मात्र यासाठी कोणत्याही सेलिब्रिटी किंवा सुप्रसिद्ध व्यक्तीला बोलावण्याऐवजी त्यांनी समाजातील सर्वधर्मीय धर्मगुरूंना आमंत्रित केले. आणि त्यांच्या उपस्थितीत आपल्या या नव्या सामाजिक संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन करत सामाजिक सलोख्याचा आणि एकतेचा संदेश दिला.
ब्रिटिशांनी त्यांच्या फायद्यासाठी आपल्याला वेगळे केले. मात्र विविधतेत एकता हीच खरी आपल्या देशाची ताकद आणि ओळख आहे. हाच प्रेमाचा, शांततेचा आणि एकतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने आपण या सर्व प्रमूख धर्मगुरूंच्या उपस्थितीत आपल्या कार्यालयाचे उद्घाटन केल्याची प्रतिक्रिया विशाल कदम यांनी दिली. यावेळी हिंदू, बौद्ध, शीख, जैन, मुस्लिम, ख्रिस्ती आणि बोहरी अशा प्रमूख धर्माच्या धर्मगुरूंची प्रमूख उपस्थिती होती. विशाल कदम आणि कुटुंबियांनी अशा अनोख्या पध्दतीने राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक केले जात आहे.
काय आहे ट्यूटेलेज इंडिया ..?
ही संस्था विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन प्रदान करणारी संस्था आहे. त्यासोबतच संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, मुलाखत कौशल्य, आत्मविश्वास विकसीत करणे, चांगल्या आदर्शांच्या, आचार-व्यवहारांच्या प्रशिक्षणासाठी विशेष मार्गदर्शनही केले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : विशाल कदम , 8108222829