आय एम ए कल्याण आणि कल्याण संस्कृती मंचचा उपक्रम
कल्याण दि.10 सप्टेंबर :
इंडीयन मेडीकल असोसिएशन आणि कल्याण संस्कृती मंचतर्फे आयोजित मंगळागौरीचा कार्यक्रम सर्वार्थाने वेगळा ठरला. आपली संस्कृती – परंपरा जपण्यासह या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याचा जागरही झालेला पाहायला मिळाला. डॉ. प्रशांत पाटील यांच्या संकल्पनेतून झालेल्या या कार्यक्रमामध्ये गृहिणींपासून ते विविध क्षेत्रात मोठ्या पदांवर कार्यरत 200 हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.
श्रावण महिना म्हटलं की महिला वर्गाच्या लाडक्या मंगळागौरीशिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही. आपल्या पूर्वजांनी संस्कृतीतील प्रत्येक सण – उत्सवाची अतिशय सुंदरपणे अध्यात्मासोबत शास्त्राशीही सांगड घालून ठेवली आहे. मंगळागौर हा सणही त्याला अपवाद नसून अध्यात्म, मनोरंजन आणि महिलांचे आरोग्य अशी त्रिसूत्री त्यामध्ये आढळून येते. नेमका हाच धागा पकडून इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याण, कल्याण संस्कृती मंचतर्फे आणि फोर्टिस हॉस्पिटलतर्फे या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ज्यामध्ये मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांसह सध्याच्या काळात वाढलेल्या महिलांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवरही प्रकाशझोत टाकण्यात आला. कल्याणातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. झाकीया खान यांनी उपस्थित महिलांना विविध हृदय रोगांबाबत मार्गदर्शन केले. तर त्यापूर्वी मंगळागौरीच्या पारंपरिक वेशात उपस्थित असलेल्या महिलांनी मंगळागौरीच्या विविध खेळांवर ठेका धरल्याचेही दिसून आले. श्रावण सखी ग्रुप, सुषमा सुमंत, रजनी भोईर आणि त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी उपस्थित इतर महिलांकडून मंगळागौरीचे हे पारंपरिक खेळ खेळून घेतले.
आपल्या संस्कृतीची ओळख नव्या पिढीला करून देण्यासह या खेळातून मिळणाऱ्या चपळता, चैतन्य आणि आनंदाची अनुभूती करून देण्याच्या उद्देशाने त्याचे आयोजन केल्याची माहिती इंडीयन मेडीकल असोसिएशनतर्फे देण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयएमए कल्याणच्या अध्यक्ष डॉ. ईशा पानसरे, उपाध्यक्ष डॉ. सुरेखा इटकर, डॉ. सोनाली पाटील, डॉ. वृणाली अहिरे, डॉ. भाग्यश्री मोघे, फिजिओथेरपिस्ट डॉ. मनिषा लाल, वर्षा मेहतर, साची कदम, कस्तुरी देसाई, प्रज्ञा बोटकुंडले, शशी शेट्टी, राशी कक्कर, डॉ. शुभांगी चिटणीस, डॉ. शीतल गवांदे, दीप्ती दिवाडकर यांच्यासह डॉ. आश्विन कक्कर, डॉ. विकास सुरांजे आदीनी विशेष मेहनत घेतली.