यंदाच्या मोसमातील आणि वर्षातीलही सर्वात निच्चांकी तापमान
कल्याण डोंबिवली दि.17 डिसेंबर :
कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण एम एम आर रिजनला थंडीमुळे हुडहुडी भरली असून आज यंदाच्या मोसमातील आणि या वर्षातीलही सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. त्यातही कल्याणमध्ये 11, डोंबिवलीत 12 आणि बदलापूरमध्ये सर्वात कमी म्हणजे अवघे 9.3 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. (Cold weather: 11 degrees Celsius in Kalyan Dombivli and 9 degrees Celsius in Badlapur)
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुढील 2-3 दिवस महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये थंडीच्या लाटेची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्रासह एम एम आर रीजनमधील वातावरणातही चांगलाच बदल जाणवत आहे. कालपासून एम एम आर रीजनचे तापमान लक्षणीयरित्या घसरल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
विशेष म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला 24 जानेवारी 2024 ला कल्याण डोंबिवलीचा पारा थेट 12 अंशापर्यंत खाली आला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यामध्ये लक्षणीय घट झाली असून आज यंदाच्या वर्षातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. कल्याणात आज 11.8 अंश सेल्सिअस तर डोंबिवलीत 12.3 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.
तर एम एम आर रिजनमध्ये बदलापूर शहरात सर्वात कमी म्हणजे अवघे 9.3 अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदवले गेले आहे. जे यंदाच्या 25 जानेवारी 2024 मध्ये 10.7 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आल्याचेही मोडक यांनी सांगितले. आज नोंदवण्यात आलेल्या तापमानाच्या या आकडेवारीवर नजर टाकल्यास एकाच वर्षांत दोन वेळा निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.
सध्या मध्य भारतावर अँटी सायक्लोनिक परिसंचरणामुळे (हाय प्रेशर एरिया) कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाची स्थिती आहे. ईशान्य दिशेहून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच हवामान शास्त्रीय दृष्टिकोनातून, आपण हिवाळ्याच्या ऋतूमध्ये आहोत. ज्यामुळे देशातील सुमारे 75% भागात तापमानात घट होत असल्याचेही मोडक यांनी स्पष्ट केले.
कल्याण डोंबिवलीसह एमएमआर रिजनचे तापमान…
कल्याण 11.8
डोंबिवली 12.3
बदलापूर 9.3
कर्जत 9.7
अंबरनाथ 10.5
ठाणे 14
पालघर 10.8
पनवेल 11.9
विरार 12.7
मुंबई 15
नवी मुंबई 13.5