कल्याण दि.23 ऑगस्ट :
म्हाडा इमारतीतील सोडतीत घोटाळ्याचा आरोप केल्याप्रकरणी मनसे आमदार राजू पाटील यांच्याविरोधात फौजदारी दावा दाखल करण्यात आल्याची माहिती ऍड. प्रदीप झेंडे यांनी दिली आहे. याप्रकरणी कल्याण न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आल्याचे ऍड. प्रदीप झेंडे यांनी सांगितले.
कल्याण मतदारसंघातील मौजे खोणी येथे असलेल्या म्हाडा इमारतीच्या सोडतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हाडाकडे चौकशीची मागणी केली होती. मात्र म्हाडाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी, या सोडतीत कोणत्याही मानवी हस्तक्षेपास वाव नसल्याचे सांगत तसेच म्हाडाच्या वरिष्ठ लिपिका छाया राठोड यांच्या नातेवाईकांनी सर्व अटी-नियमांची पूर्तता करून सदनिकांचा ताबा घेतल्याचे चौकशीत स्पष्ट करत ही तक्रार निकाली काढल्याचेही ऍड. प्रदीप झेंडे यांनी सांगितले.
दरम्यान याप्रकरणी मनसे आमदार राजू पाटील यांनी नाहक बदनामी केल्याचे सांगत कल्याण न्यायालयात त्यांच्याविरोधात फौजदारी दावा दाखल केल्याची माहिती ऍड. प्रदीप झेंडे यांनी दिली आहे.