कल्याण दि. 19 मे :
कल्याण डोंबिवली शहरात जे चांगले बदल होत आहेत त्या चांगल्या गोष्टींवर नागरिकांनी अधिक भर देण्याची गरज केडीएमसी आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांनी व्यक्त केली. क्रेडाई – एमसीएचआय आयोजित 11 व्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी कल्याण डोंबिवलीतील विकासाबाबत बोलताना त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली.
कल्याण डोंबिवली शहरे हे आपले घर आहे. आपलं घर छोटं आहे, काही अडचणी आहेत. ज्याप्रमाणे आपण आपल्या घराबद्दल जेवढं चांगल बोललो तरच घरी पाहुणे येतील. मात्र सारखं रडत बसलो तर पाहुणे येणार नाहीत अशा शब्दांत केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी शहरात होणारे बदल सकारात्मक दृष्टीकोनातून बघण्याचे आवाहन केले.
त्यासोबतच केडीएमसीची लोकसंख्या आज 25 लाखांच्या घरात पोहोचली आहे. पुढील 25 वर्षांची पाण्याची गरज लक्षात घेता केडीएमसीसाठी स्वतंत्र धरण बांधण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत प्रयत्न सुरू आहेत. तर नागरिकांना एक शहर म्हणून काय पाहीजे असते तर चांगले रस्ते, मुबलक पाणी, उद्याने, मैदाने, सुरक्षित वातावरण, शहरांची फुफ्फुसे म्हणून काम करण्यासाठी शहरी जंगल आदींची आवश्यकता असते. या सर्व बाबतीत केडीएमसी प्रशासन अत्यंत उत्कृष्टपणे काम करीत असल्याचे त्यांनी 200 इलेक्ट्रिक बस, एलईडी पथदिवे, नेव्हल म्युझियम, शहर सुशोभीकरण आदी उदाहरणे देत स्पष्ट केले.
तर कल्याण डोंबिवलीतील बांधकाम व्यावसायिकानी एस टी पी आणि कचरा व्यवस्थापन नियमांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचे आवाहनही डॉ. सुर्यवंशी यांनी यावेळी केले.
तर एमएमआर रिजनमध्ये कल्याण डोंबिवली ही शहर झपाट्याने पुढे येत आहेत. मग ते रोड नेटवर्क असो की मेट्रोचे जाळे असो. यासोबतच अनेक मोठ मोठे ब्रँड, मोठे व्यावसायिक कल्याणमध्ये येत आहेत. कल्याणही पुणे शहराप्रमाणे शैक्षणिक हब बनत असून 1 हजार 170 रेरा रजिस्टर प्रकल्प या एरियात सुरू असल्याची माहिती एम सी एच आय क्रेडाई कल्याण डोंबिवली युनिटचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी सांगितले.
कल्याणातील वासुदेव बळवंत फडके मैदानावर आजपासून 22 मेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये ३५ नामांकित विकासकांचे १५० हून अधिक गृहप्रकल्पांचा समावेश आहे.
या ११ व्या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला डॉ. विजय सुर्यवंशी, डीसीपी सचिन गुंजाळ, एमसीएचआय मुंबईचे बोमन इराणी यांच्यासह राजन बांदेलकर, एसबीआयचे डेप्युटी जनरल मॅनेजर अतुल राठी, एमसीएचआय कल्याण डोंबिवलीचे जयेश तिवारी, माजी अध्यक्ष रवी पाटील, सदस्य मिलिंद चव्हाण, सुनिल चव्हाण यांच्यासह अनेक बांधकाम व्यावसायिक आणि मान्यवर उपस्थित होते.