कल्याण दि.5 जानेवारी :
नवजात आणि लहान मुलांना सोडून जाण्याच्या घटना कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढत चालल्या आहेत. या पार्श्वभूमीवर 3 महिन्यांच्या चिमुरडीला कल्याण स्टेशन परिसरात सोडून जाणाऱ्या निर्दयी पित्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
2 जानेवारी रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिमेच्या स्टेशन परिसरात एक अनोळखी इसम लहान मुलीला घेऊन संशयास्पदरित्या फिरत असल्याचे संकेत बने आणि त्याच्या मित्रांनी पाहिले. त्याचदरम्यान हा इसम या चिमुरडीला गुरुदेव हॉटेलसमोरील स्कायवॉकच्या जिन्यामागे ठेवून पळून जात असताना संकेत आणि त्याच्या मित्रांनी त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता ‘बाळाची आई तिला सोडून गेली आहे, त्यामुळे आपण तिचा सांभाळ करू शकत नसल्याने आपण तिला सोडून जात होतो असल्याचे त्याने सांगितले. ते ऐकून त्यांना धक्काच बसला. दरम्यान संकेतने याबाबत भाजप शहराध्यक्ष प्रेमानाथ म्हात्रे, युवा मोर्चा अध्यक्ष साईनाथ गोईकणे, सचिव तेजस केंबारे , विद्यार्थी विभाग संयोजक मिथिल जोशी यांच्याशी संपर्क केला. सुरुवातीला या पित्याला आणि चिमुरडीला साईनाथ गोईकणे यांच्या कार्यालयात नेण्यात आले. डॉ. पंकज उपाध्याय यांनी या मुलीची तपासणी करत मुलगी सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर निर्दयी पित्याला महात्मा फुले पोलीस ठाण्यात नेण्यात आले तर चिमुरडीला डोंबिवलीतील जननी आशिष आश्रमात ठेवण्यात आले आहे.
याबाबत तेजस केंबारे यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून खलील शेखला पोलिसांनी अटक केली आहे. तर तिच्या आईचा पोलीस शोध घेत असून 2 महिन्याच्या या चिमुरडीला डोंबिवलीतील जननी आशिष संस्थेत ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांनी दिली.
दरम्यान जागरूक नागरिक संकेत बने आणि त्याच्या मित्रांनी दाखवलेल्या जागरूकतेमुळे या चिमुरडीचा जीव वाचण्यास मदत झाली असून त्यांचे सर्वांकडून कौतुक करण्यात येत आहे.