कल्याण दि.5 जुलै :
राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण राज्यभरातील शासकीय कार्यालयांमध्ये मोठी गर्दी उसळली आहे. मात्र या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांसाठी पैसे मागण्याच्या तक्रारी येत असून पैशांची मागणी करणाऱ्या दलाल आणि शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केली आहे. लाडकी बहीण योजनेची कागदपत्रे देण्यासाठी पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्याचे सांगत पोटे यांनी ही मागणी केली आहे.(Chief Minister’s Beloved Sister Scheme; Sachin Pote’s demand to take action against people who take money)
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, फॉर्म भरून घेणे यासह या संपूर्ण प्रकियेत महिलांची अडवणूक होत आहे. ही कागदपत्रे देण्यासाठी दिरंगाई करून आवाजवी पैशाची मागणी करून माता भगिनीची प्रचंड लूट करण्यात येत असल्याची माहिती पोटे यांनी दिली आहे. तर ही योजना म्हणजे महिलांची प्रचंड अडवणूक करण्याचे साधन होत असून शासन – प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी ही योजना पारदर्शीपणे राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
त्याचबरोबर ही संपूर्ण प्रकिया पारदर्शकपणे आणि जलद गतीने होईल यासाठी जिल्हाधिकारी यांनी लक्ष ठेवावे, यां योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रभागानुसार अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, फॉर्म भरून देण्याचे निमित्ताने महिलांकडून 3 ते 3 हजार 200 इतके पैसे घेत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्याची माहिती सचिन पोटे यांनी दिली आहे. तसेच आपल्या बहिणींची लूट करणाऱ्या या लुटारू भाऊ आणि महा-ई -सेवा केंद्रांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, राष्ट्रीयकृत बँकांमध्ये उघडण्यात आलेल्या जनधन खात्यासारखी पर्यायी व्यवस्था उभी करण्याची आग्रही काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.त्यावर आता राज्य सरकार काय निर्णय घेते हे लवकरच स्पष्ट होईल.