कल्याण पश्चिमेतील मॅक्सी ग्राउंड तर डोंबिवलीतील स्वामी समर्थ मठाजवळ सभेचे आयोजन
कल्याण डोंबिवली दि.12 नोव्हेंबर :
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलेला पाहायला मिळत असून राज्यभरात दिग्गजांच्या सभांचा धडाका पाहायला मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कल्याण आणि डोंबिवलीत जाहीर सभा होणार आहेत. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर आणि कल्याण ग्रामीणमधील महायुती उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारासाठी उद्या 13 नोव्हेंबर रोजी या जाहीर सभा होणार आहेत. (Chief Minister Eknath Shinde’s public meeting tomorrow for grand alliance candidates Vishwanath Bhoir and Rajesh More)
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारासाठी कल्याण पश्चिमेतील रामबाग येथील स्व.यशवंतराव चव्हाण क्रीडांगण (मॅक्सी ग्राउंड) येथे सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोफ धडाडणार आहे.
तर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारासाठी उद्या सायंकाळी 6 वाजता नांदिवली,स्वामी समर्थ मठ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेणार आहेत.
या दोन्ही जाहीर सभांची शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून जय्यत तयारी केली जात आहे.