कल्याण डोंबिवलीमध्ये पाणी पुरवठा अतिरिक्त दाबाने करण्याचेही एमआयडीसी निर्देश
मुंबई दि.१६ जुलै :
कल्याण मलंगगड-कुशिवली धरणाचे काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत. या धरणाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असून ही मागणी तातडीने पूर्ण करण्याची मागणी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केली होती. या 10 एमएलडी क्षमतेचे धरण बांधून पूर्ण केल्यास त्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, दिवा भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत साडे सहा एमएलडी पाणी पुरवठा करण्याचे आदेशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
एमएमआर रिजनमधील पाणीपुरवठा प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष बैठक आज पार पडली. या बैठकीत कल्याण डोंबिवली मतदारसंघातील नागरिकांच्या पाणी प्रश्नाबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आग्रही भूमिका मांडली.
कल्याण मलंगगड-कुशिवली धरणाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. मध्यंतरी हे काम सूरु होणार असतानाच जमीन अधिग्रहणाच्या बाबतीत घोटाळा उघडकीस आला होता. यातील दोषींवर कारवाई केल्यानंतर आता या धरणासाठी जमीन अधिग्रहण प्रक्रिया ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा सुरू केली आहे. ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून हे धरण लवकरात लवकर बांधून पूर्ण करावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत जलसंपदा विभागाला दिले आहेत.
10 एमएलडी क्षमतेचे हे छोटे धरण असून ते तयार झाल्यास या भागातील पाणी प्रश्न कायमचा दूर होऊ शकतो त्यामुळे या धरणाचे काम तातडीने हाती घेण्याचे निर्देश या बैठकीत दिले आहेत. या भागातील पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी जनजीवन मिशन योजना मंजूर झाली आहे. त्याअंतर्गत ५० कोटी रुपयांचे निधी मंजूर झाला आहे. धरणाचे काम पूर्ण झाल्यास हर घर नल योजनेचे उद्दिष्ट प्रभावीपणे साध्य करता येईल असे श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. साडे सहा एमएलडी अतिरिक्त पाणी पुरवठ्यामुळे दिवा परिसराला एकूण ४१.५ एमएलडी पाणी मिळेल. त्यामुळे या भागातील पाणी टंचाई दूर होईल असा विश्वासही खासदारांनी व्यक्त केला.
एमआयडीसीच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवलीच्या 27 गावामध्ये करण्यात येणारा पाणीपुरवठा हा अपेक्षित दाबाने होत नसल्याने हा पाणी पुरवठा पुरेशा दाबाने करावा असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. येत्या काही दिवसात हा प्रश्न सोडवण्यात येईल असे एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
जांभूळ धरणातून शहाड शहराला पाणीपुरवठा होतो, या पाणीपुरवठा वाहिन्या अतिशय जीर्ण झाल्या असून त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होते, या वाहिन्या तातडीने बदलण्याची मागणी यावेळी केली. तसेच हा प्रश्न तातडीने मार्गी लावून पाणीपुरवठा नियमित करण्याच्या सूचना देखील संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.