कल्याण दि. २४ ऑगस्ट :
कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन अर्थातच के डी एम टी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. परिवहन कामगार कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून या विविध प्रश्नांसाठी पाठपुरावा सुरू होता. ज्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह ५९ वाहक पदांना मंजुरी मिळण्याच्या निर्णयावरही मुख्यमंत्र्यांनी शिक्कमोर्तब केले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांच्या माध्यमातून ३१ मे रोजी बैठक झाली होती. विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार नगरविकास विभगाचे अवर सचिवांनी ही बैठक आयोजित केली होती. ज्यामध्ये नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, केडीएमसी तत्कालीन आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, परिवहन व्यवस्थापक डॉ. दिपक सावंत आदी प्रमुख अधिकारी आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
ज्यामध्ये के डी एम टीच्या ५९ वाहक पदांना मंजुरी मिळणे, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन १९८२ जुनी पेंशन योजना लागू करणे, आकृती बंध मंजुर करणे, तंत्र मदतनीस कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करणे आणि प्रलंबित थकबाकी मिळणे आदी प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांनी दिली.
दरम्यान या बैठकीतील इतिवृत्तवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १७ ऑगस्ट रोजी सही करत शिक्कामोर्तब केल्याने हे प्रलंबित प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे परिवहन कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू होण्यासह ५९ वाहक कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रश्नही मार्गी लागल्याचे पाटील यांनी सांगितले.
अनेक वर्षे प्रलंबित असणाऱ्या या प्रश्नांवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघ्या काही महिन्यांत निर्णय घेत त्यांची सोडवणूक केली आहे. यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गतिमान कारभाराचे आणखी एक उदाहरण सादर केल्याचे सांगत परिवहन संघटनेने त्यांचे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत.