550 कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
कल्याण – डोंबिवली दि.13 ऑक्टोबर :
कल्याण डोंबिवली परिवहन सेवा अर्थातच केडीएमटीच्या (कल्याण डोंबिवली म्युनिसिपल ट्रांसपोर्ट) कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सन 2000 नंतर केडीएमटीमध्ये रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. परिवहन कामगार कर्मचारी संघटनेकडून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून या मागणीसाठी पाठ पुरावा सुरू होता. (Chief Minister Eknath Shinde orders to implement old pension scheme for KDMT employees)
1999 मध्ये कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सेवेची स्थापन झाली आहे. त्यामध्ये सन 2000 नंतर कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने चालक – वाहक पदांसाठी भरती झाली होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या या महत्त्वपूर्ण आदेशाचा फायदा तब्बल 550 कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याची माहिती परिवहन कामगार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांनी दिली. गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून या कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी लढा सुरू होता. तसेच जुनी पेन्शन योजनेसाठी पात्र असतानाही केडीएमटी प्रशासनाकडून चुकीच्या पद्धतीने त्यांना नव्या पेन्शन योजना लागू करण्यात आली. परिणामी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे शासनाकडून न्याय मिळवून देण्यासाठी परिवहन कामगार कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष या नात्याने आपण दाद मागितली होती. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी याप्रश्नी राज्य शासनाकडे पाठपुरावा करत या 550 कर्मचाऱ्यांवर पेन्शन योजनेबाबतचा अन्याय दूर केल्याची भावनाही पाटील यांनी व्यक्त केली आहे.
या 550 कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रतीक पेणकर, शरद जाधव, गुलाब पाटील आणि प्रमोद बागुल यांनीही गेली दोन वर्षे आवश्यक ती कार्यवाही केली असून परिवहन कामगार कर्मचारी संघटनेसह केडीएमटीमधील इतर सर्वच संघटनांचाही याकामी महत्त्वपूर्ण हातभार लागला आहे.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुनी पेन्शन लागू करण्याचे आदेश दिल्याने या 550 कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, परिवहन कामगार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी आणि संघटनांचे आभार मानले. यावेळी केडीएमटीमधील इतर संघटनेचे प्रमूख महेश पाटील, महेश गायकवाड हेदेखील उपस्थित होते.