आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने दिपोत्सव साजरा
कल्याण दि.9 नोव्हेंबर :
यंदाच्या दिवाळीची सुरुवात कल्याणकरांसाठी अत्यंत भारावलेली अशी झाल्याचे दिसून आले. निमित्त होते ते कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यातर्फे भगवा तलाव परिसरात आयोजित दिपोत्सव सोहळ्याचे. यावेळी तब्बल 1 हजार 500 दिव्यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली छत्रपती शिवरायांची प्रतिकृती ही या दिपोत्सवाची केंद्रबिंदू आणि विशेष आकर्षण ठरली. (A replica of Chhatrapati Shivaray was created in Kalyan through one and a half thousand lamps)
कल्याण शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी, त्यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला.
या दिपोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 1 हजार 500 दिव्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची 10×10 फुटांची भव्य अशी प्रतिकृती साकारण्यात आली होती. ज्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे अक्षरशः पारणे फेडले. महाराष्ट्रातील बहुधा हा पहिल्याच प्रकारचा प्रयत्न होता. त्यासोबत भगवा तलाव परिसरातही उपस्थित मान्यवर आणि कल्याणकर नागरिकांच्या हस्ते या तलाव परिसरात 1 हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले. हा दिपोत्सव डोळ्यात साठवण्यासाठी आणि याचा साक्षीदार होण्यासाठी शिवप्रेमी आणि कल्याणकर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अण्णा बेटावदकर, केडीएमसीचे ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. प्रशांत पाटील, डॉ. राजेश राजू, डॉ. अश्विन कक्कर, डॉ. गणेश शिरसाट, डॉ. गणेश ढेकणे, शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील, माजी महापौर वैजयंती घोलप यांच्यासह अनेक माजी नगरसेवक, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.