Home क्राइम वॉच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: शिल्पकार जयदीप आपटे अखेर पोलिसांच्या ताब्यात

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: शिल्पकार जयदीप आपटे अखेर पोलिसांच्या ताब्यात

कल्याण दि.5 सप्टेंबर :
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या दुर्घटनेप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. कल्याणातील घरी आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलेल्या जयदीप आपटेला पोलिसांनी ताब्यात घेतले.

गेल्या महिन्यात 23 ऑगस्ट रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर शिवप्रेमींसह संपूर्ण राज्यभरात या घटनेविरोधात संतापाची लाट उसळली. तर या घटनेप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर गुन्हे दखल करण्यात आले होते. याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलला काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र शिल्पकार जयदीप आपटेचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याने पोलीस त्याचा कसून शोध घेत होते.

दरम्यान बुधवारी रात्री जयदीप आपटे त्याच्या कल्याणातील घरी कुटुंबियांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार काल रात्री जयदीप आपटे कल्याणातील इमारतीच्या परिसरात आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. कल्याण पोलिसांनी त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिले असून आता त्याच्या पुढील चौकशीत महाराजांच्या पुतळा दुर्घटनाप्रकरणी नेमकी काय माहिती समोर येते हे पाहावे लागणार आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा