आरक्षण न मिळाल्यास जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देण्याचा इशारा
कल्याण दि. 27 ऑक्टोबर :
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून कल्याणातही मराठा क्रांती मोर्चातर्फे आजपासून तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. या साखळी उपोषणामध्ये शिवसेना शिंदे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरेदेखील सहभागी झाले असून मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. (Chain hunger strike of Maratha Kranti Morcha in Kalyan also in support of Manoj Jarange Patil)
मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी चाळीस दिवसांच्या अल्टीमेटमनंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्याला राज्याच्या विविध भागांतून मराठा समाजाचा पाठींबा मिळत असल्याचे दिसत आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला ठीकठिकाणी मराठा समाज बांधवांकडून उत्स्फूर्तपणे पाठींबा मिळत असल्याचे दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून कल्याणातही मराठा क्रांती मोर्चातर्फे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान कल्याणात शांततेत हे साखळी उपोषण सुरू असून या साखळी उपोषणासाठी पोलिसांनी परवानगी नाकारत नोटीस दिल्याची माहिती यावेळी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी दिली. तसेच राज्यात मराठा मुख्यमंत्री असतानाही पोलीस मराठ्यांना नोटीस देत असतील तर मराठा मुख्यमंत्री नको अशी प्रतिक्रिया मोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.