कल्याण दि.2 जुलै :
कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांनी डॉक्टरांकडे जाणे टाळले. तर कोरोनाशी दोन करण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा व्यस्त असल्याने अशा घटकांपर्यंत पोहचणे डॉक्टरांनाही शक्य झाले नाही. ही बाब लक्षात घेत इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणच्या वतीने “डॉक्टर्स डे”चे औचित्य साधून शहरातील अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमात हेल्थ कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
टिटवाळा येथील जीवन संवर्धन अनाथाश्रम, अंबरनाथ एमआयडीसी येथील कमलधाम वृद्धाश्रम आणि डोंबिवली पूर्वेकडील मैत्री वृद्धाश्रम या ठिकाणी आयएमए कल्याणच्या डॉक्टरांच्या टीमने भेट दिली. यावेळी डॉक्टरांतर्फे रक्तदाब, डायबेटिस, त्वचा तसेच डोळे आणि गुडघेदुखी, सांधेदुखी आदी तपासण्या करण्यात आल्या. तर अनाथाश्रमामध्ये चाळीस मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी 6 मुलांना सामान्य स्वरूपाचा तर 2 जणांना तीव्र ऍनिमिया असल्याचे आढळून आले. वृद्धाश्रमातील एकूण 60 ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये डोळे तपासणीच्या वेळी ज्यांना स्पष्ट दिसण्याबाबत अडथळा आला अशा नागरिकांना शासकीय योजनेअंतर्गत पुढील वैद्यकीय सेवा कल्याणमधील इशा नेत्रालय रुग्णालयात देण्यात येणार असल्याची माहिती कल्याण आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले. यावेळी डॉ सुरेखा ईटकर, डॉ हर्षल निमखंडे, डॉ. हिमांशू ठक्कर यांच्यासह आयएमए कल्याणचे अनेक पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले होते.