कल्याण दि.15 जानेवारी :
एकीकडे ग्राम पंचायत निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली असतानाच कल्याण ग्रामीणमधील आणे-भिसोळ ग्रामपंचायत निवडणुकीत जादूटोण्याचा प्रकार समोर आला आहे. या ग्रामपंचायतीच्या वेशीवर असणाऱ्या वाघेरापाडा स्मशानभूमीत निवडणूकीच्या रिंगणात असणाऱ्या उमेदवारांची हाताने नावे लिहिलेला कागद कणकेच्या गोळ्यात खोचलेला आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून उलट सुलट चर्चना उधाण आले आहे.
ठाणे जिल्ह्यातील आणि कल्याण तालुक्यातील आणे भिसोळ ग्रामपंचायतीसाठीही आज मतदान होत आहे. त्याचदरम्यान आणे-भिसोळ आणि वाघेरा पाडा गावांच्या वेशीवर असणाऱ्या वाघेरा पाडा स्मशानभूमीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाघेरा पाडा गावातील एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी स्थानिक ग्रामस्थ स्मशानभूमीत आले. त्यावेळी हा सर्व प्रकार उघड झाला. स्मशानभूमीत चितेशेजारी एका कणकेच्या गोळ्यामध्ये उमेदवारांची नावं असलेला हा कागद खोचण्यात आला होता. या प्रकारामुळे निवडणूक आणि जादूटोण्याचे प्रयोग याची उलट सुलट चर्चा रंगली आहे. एकीकडे अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा संमत झाला असला तरी असल्या गोष्टी अद्यापही थांबल्या नसल्याचेच प्रकारावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.