Home ठळक बातम्या “त्या” ठेकेदाराचे भगवा तलाव परिसराच्या मेंटेनन्सचे कंत्राट रद्द करा – श्रेयस समेळ...

“त्या” ठेकेदाराचे भगवा तलाव परिसराच्या मेंटेनन्सचे कंत्राट रद्द करा – श्रेयस समेळ यांची केडीएमसी आयुक्तांकडे मागणी

कल्याण दि.18 ऑक्टोबर :
कल्याण शहराची शान असलेल्या प्रबोधनकार ठाकरे भगवा तलाव परिसराच्या देखभाल दुरूस्तीचे कंत्राट संबंधित ठेकेदाराकडून रद्द करण्याची मागणी माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी केली आहे. संबंधित ठेकेदाराकडून भगवा तलाव परिसरामध्ये टपरी टाकण्यास परवानगी देण्यात आल्याबाबत समेळ यांनी केडीएमसी आयुक्तांकडे लेखी तक्रार करून ही मागणी केली आहे. (Cancel “that” contractor’s contract for maintenance of saffron lake area – Shreyas Samel’s demand to KDMC Commissioner)

भगवा तलाव परिसरामध्ये एक व्यक्ती टपरी टाकून व्यवसाय करत असल्याची माहिती युवासेनेचे उपशहर प्रमुख मेघन सल्पी यांनी आपल्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर आपण याठिकाणी जाऊन पाहणी केली असता आपल्यालाही याठिकाणी हा टपरी चालक आढळून आला. या टपरी चालकाकडे यासंदर्भात विचारणा केली असता आम्हाला कंत्राटदाराने टपरी लावण्यास परवानगी दिल्याची माहिती त्याने दिल्याचे श्रेयस समेळ यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. तसेच हा टपरी चालक याठिकाणी चोरून वीज वापरत असल्याचेही यावेळी आपल्या निदर्शनास आल्यासह संपूर्ण तलाव परिसरामध्ये अशाप्रकारे टपऱ्या उभ्या राहणार असल्याचे नागरिकांनी सांगितल्याचेही समेळ यांनी पत्रात म्हटले आहे.

तसेच या प्रबोधनकार ठाकरे भगवा तलाव परिसरामध्ये कॅफेटरियासाठी काही जागा निश्चित करण्यात आल्या असून त्याचठिकाणी स्टॉल लावण्यास परवानगी देण्यात आल्याच्या नियमाचीही श्रेयस समेळ यांनी पत्राद्वारे आठवण करून दिली आहे. मात्र संबंधित ठेकेदार संपूर्ण नियम धाब्यावर बसवून सर्वत्र टपऱ्या उभ्या करणार असल्याचा आरोप करत या टपऱ्यांमुळे तलाव सुशोभीकरणासाठी खर्च केलेला कोट्यवधींचा निधी वाया जाणार असल्याकडेही समेळ यांनी लक्ष वेधले आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदार मनमानी पद्धतीने कारभार करत असून त्याचा ठेका रद्द करून नवीन निविदा मागविण्यात यावी, नागरिकांच्या करातून होणारी पैशांची उधळपट्टी थांबवावी आणि ही टपरी त्वरित हटवून पुन्हा असे अतिक्रमण न होण्यासाठी काळजी घेण्याची आग्रही मागणी श्रेयस समेळ यांनी आपल्या पत्राद्वारे केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा