बाळासाहेबांची शिवसेना पक्षासह वारकरी संप्रदयातील प्रतिनिधींचाही सहभाग
डोंबिवली दि.16 डिसेंबर :
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्रातील संतांबाबत केलेल्या त्या वक्तव्यावरून बाळासाहेबांची शिवसेना पक्ष चांगलाच आक्रमक झाला असून याविरोधात उद्या डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण परिसरात बंदची हाक देण्यात आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेमध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत उद्याच्या बंदबाबत माहिती देण्यात आली.
गेल्या दोन दिवसांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्रातील संतांबाबत केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओनंतर सुषमा अंधारे यांनी माफीही मागितली. मात्र या मुद्द्यावरून बाळासाहेबांची शिवसेना पक्षासह इतर हिंदुत्ववादी संघटनाही आक्रमक झालेल्या दिसत आहेत.
डोंबिवली येथील मध्यवर्ती कार्यालयाचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. तसेच अंधारे यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ उद्या डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण परिसरात बंद पाळण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या पत्रकार परिषदेला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी,रिक्षा संघटनेच्या पदाधिकारीही उपस्थित होते.
उद्याच्या या बंदमध्ये विविध रिक्षा संघटना, व्यापारी संघटना, वारकरी संप्रदायातील अनेक लोकंही सहभागी होत असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांबद्दल केलेलं अपमानजनक वक्तव्य सहन केले जाणार नाही. तसेच पुन्हा असे वक्तव्य केल्यास त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
यावेळी पत्रकार परिषदेला युवासेनेचे दिपेश म्हात्रे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे राजेश कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.