कल्याण ग्रामीण दि.७ जुलै :
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची मराठी माणसाची इच्छा असली तरी समोरच्यालाही वाटले पाहिजे. मात्र समोरच्याला युतीपेक्षा भितीच जास्त वाटत असल्याचा टोला मनसे आमदार राजू पाटील यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. मनसे आमदार राजू पाटील यांनी गुरुवारी सागावमधील नागरिकांच्या समस्या मनसे आमदार राजू पाटील यांनी जाणून घेतल्या. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
राज आणि उद्धव यांनी एकत्र येण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर काल खासदार संजय राऊत आणि मनसे नेते अभिजित पानसे यांची भेट घेतली. त्याबाबत मनसे आमदार पाटील यांना विचारल्यानंतर त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते अडचणीत असताना आम्ही युती का करावी? आमचे राजसाहेब अडचणीत असताना तुम्ही आमचे नगरसेवक फोडले. आता तुमच्यावर वाईट वेळ आलीय म्हणून आम्ही युती करायची का? असा सवाल करत आमदार पाटील यांनी मनसेने युती करू नये असे आपले वैयक्तीक मत असल्याचेही स्पष्ट केले.
तर जनतेने दिलेला कौल मान्य करून त्याला मान देण्याऐवजी सत्तेतील हिस्स्यासाठी भांडत बसले नसते. तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. त्यामुळे एकट्या देवेंद्र फडणवीस यांना दोष देऊन काहीही फायदा नाही. लोकांनी जो कौल दिला होता, त्याच्याविरोधात सगळे घडले. ज्याचे भोग त्यांच्यासोबत जनताही भोगत असल्याची तिखट टीका आमदार राजू पाटील यांनी यावेळी केली.
मनसे आमदारांनी जाणून घेतल्या मतदारसंघातील समस्या…
दरम्यान मनसे आमदार राजू पाटील यांनी बुधवारी दिव्यात वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, खड्डे आदी समस्या नागरिकांकडून जाणून घेतल्या होत्या. त्यापाठोपाठ गुरुवारी सागावमध्ये जाऊन नागरिकांच्या पाणी, कचरा, गटार, नालेसफाई, धोकादायक विजेचे खांब आदी समस्या जाणून घेतल्या. तर सागावमधील नागरिकांना आमदार निधीमधून जलवाहिनीसाठी तातडीने १० लक्ष रुपये देण्याचे आश्वासन आमदार राजू पाटील यांनी दिले आहे. तसेच नागरिकांची खड्ड्यांच्या जाचामधून सुटका करण्यासाठी तातडीने खड्डे भरण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
यावेळी मनसेचे जिल्हा संघटक हर्षद पाटील, कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष विनोद पाटील,डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत, मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष मिलिंद म्हात्रे,माजी नगरसेवक प्रभाकर जाधव यांसह मनसेचे सर्व पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.