नवी दिल्ली दि. 1 एप्रिल :
दिवा आणि कोपर रेल्वे स्थानकादरम्यान दातिवली रेल्वे स्थानक उभारण्याची गेल्या ४० ते ४५ वर्षांपासूनची मागणी आहे. मध्य रेल्वे ही सर्वाधिक व्यस्त रेल्वे व्यवस्था आहे. मात्र दातिवली स्थानकाच्या उभारणीमुळे सुमारे चार लाख प्रवाशांना त्याचा फायदा होईल आणि दिवा रेल्वे स्थानकावरील गर्दीचा ताणही कमी होईल. भौगोलिकदृष्ट्या दातिवली स्थानकाचे महत्व ओळखून दातिवली स्थानकाच्या उभारणीची मागणी मान्य करावी अशी विनंती कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.
दातिवलीतील अनेक प्रवासी रेल्वे मार्गांवरून दिवा स्थानकात जाण्यासाठी रेल्वे रूळांवरचा जीवघेणा प्रवास करत असतात. त्यामुळे अनेकदा अपघात होत असतात. दातिवली हा झपाट्याने विस्तारणारा भाग आहे. देशासाठी महत्वाकांक्षी असलेला बुलेट ट्रेन प्रकल्पातही दातिवली स्थानकाचा समावेश आहे. याच भागात एमएमआरडीए बीकेसी प्रमाण विकास केंद्र विकसीत करणार आहे. मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी दातिवली स्थानक महत्वाचे केंद्र बनण्याची क्षमता असलेले ठिकाण आहे. कल्याण – ठाणे – मुंबई हा जलमार्गही दातिवलीजवळून जातो. त्यामुळे दातिवली हे या सर्वांचे केंद्र ठरू शकते. त्यामुळे दातिवली स्थानकाच्या उभारणीसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून दातिवली स्थानकाच्या उभारणीची मागणी करत आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाने अद्याप याकडे गांभीर्याने पाहिले नाही. मात्र दातिवली स्थानकाचे भौगोलिक स्थान आणि त्याच्या उभारणीमुळे कोकण रेल्वे, मध्य रेल्वे, ठाणे, कल्याण, भिवंडी या स्थानकांना होणारा फायदा पाहता खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा एकदा दातिवली रेल्वे स्थानकाचा प्रश्न रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. दिवा आणि कोपर रेल्वे स्थानकादरम्यान दातिवली स्थानकाची उभारणी करण्याच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.
पूर्ण स्थानकाचा दर्जा द्यावा…
दातिवली स्थानक सध्या हॉल्ट स्टेशन अर्थात थांबा स्थानक असून त्याला पूर्ण स्थानकाचा दर्जा देण्याची नितांत गरज आहे. स्थानकातील पादचारी पूल जीर्ण झाला आहे. लाद्या निखळल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची सुविधा स्थानकात नाही, स्वच्छतागृह, तिकीट खिडकीही उपलब्ध नाही. त्यामुळे रेल्वेचा महसूलही बुडतो आहे. छपर सुस्थितीत नसल्याने प्रवाशांना उन्हाळा, पावसाळ्यात त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या स्थानकाला पूर्ण स्थानकाचा दर्जा देऊन या सुविधा येथे उभारण्याची मागणी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. तसेच दिवा स्थानकातून मुंबईसाठी लोकल सोडणे, सोबतच स्थानकात होम प्लॅटफॉर्म उभारणे, रेल्वे आरक्षण केंद्र सुरू करणे, पूर्व भागात तिकीट खिडकी उभारणे, दिवा पनवेल रेल्वे गाड्यांची संख्या वाढवणे, छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई ते पनवेल या मार्गावर लोकलसेवा सुरू करून त्या दिवा मार्गे नेणे, कोकण रेल्वेवर धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देणे, कल्याण सावंतवाडी या नव्या पॅसेंजर गाडी सुरू करणे, डहाणू – पनवेल मेमो फेऱ्या वाढवणे आणि चिपळून – पनवेल उत्सव विशेष गाडी दिवा स्थानकापर्यंत वाढवण्याची मागणी रेल्वे राज्यमंत्र्यांकडे डॉ. शिंदे यांनी केली आहे.