
डोंबिवली दि. 1 एप्रिल :
अरबी समुद्राऐवजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारून तो परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित केल्यास कोकणात पर्यटन वाढेल अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही मागणी केली आहे.
जगात कुठेही फिरताना महाराष्ट्राची ओळख ज्यांच्या नावामुळे होते ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गड किल्ले यांची दुरावस्था झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्मारक होईल तेव्हा होईल. पण छत्रपतींची जी खरी स्मारके आहेत. त्यांचे जतन करणो गरजेचे असल्याचे आमदार राजू पाटील यांनी म्हटले आहे.
शिवस्मारक हे अरबी समुद्राऐवजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभारल्यास पायाभरणीचे शेकडो रूपये वाचतील. त्यातून परिसरात इतर सुविधा देता येतील. शिवाजी महाराजांनी आरमार सज्ज करून समुद्रावरही राज्य केले आहे. शिवाजी महाराजांनी जलदुर्गाची श्रृंखलात तयार केली होती. त्यांच्या जलदुर्गातील महत्त्वपूर्ण किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला आहे. या किल्ल्यात शिवाजी महाराजांच्या हाताचे- पायाचे ठसे आहेत. शिवाजी महाराजांचे ठसे असणारा हा एकमेव किल्ला आहे. म्हणूनच शिवाजी महाराजांचे स्मारक सिंधुदुर्ग किल्ल्यावर तयार केल्यास समुद्रातील पायाभरणीचे शेकडो कोटी रूपये वाचण्यासह हा परिसर पर्यटन म्हणून विकसित होईल, असे विविध मुद्देही आमदार राजू पाटील यांनी मांडले आहेत.