कल्याण-डोंबिवली दि.17 मार्च :
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ‘क’ प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याला लाच घेताना पकडल्यानंतर केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी 7 प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या तडका फडकी (Bribery case; Suddenly, 7 ward officers were transferred by the Municipal Commissioner) बदल्या केल्या आहेत. अल्पावधीतच युवा आणि कार्यतत्पर अधिकारी अशी ओळख असणाऱ्या अक्षय गुडधे यांच्यावर हॉटसीट अशी ओळख असणाऱ्या क प्रभाग क्षेत्र कार्यालयाचा पदभार सोपवण्यात आला आहे.
2 दिवसांपूर्वी कल्याणच्या क प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे आणि एका कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. बांधकामाच्या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी 15 हजरांची लाच घेताना या दोघांना ठाणे अँटी करप्शनने पकडले होते. या लाचखोरीच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा केडीएमसीची नकारात्मक चर्चा सुरू झाली होती. त्यामूळे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अचानकपणे केडीएमसीच्या 10 पैकी 7 प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या करत एकप्रकारे लाचखोरी कोणत्याही स्वरूपात सहन केली जाणार नसल्याचा संदेश दिला आहे. त्यामूळे आता महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम केडीएमसीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी कितपत होतो हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. (kdmc)
या 7 प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या…
सुधीर मोकल – अ क्षेत्रातून, ड प्रभाग क्षेत्रात
सुहास गुप्ते – ब क्षेत्रातून , ह प्रभाग क्षेत्रात
भरत पाटील – जे क्षेत्रातून, फ प्रभागक्षेत्रात
वसंत भोंगाडे – ड क्षेत्रातून, जे प्रभागक्षेत्रात
राजेश सावंत – फ क्षेत्रातून, अ प्रभागक्षेत्रात
भारत पवार – ह क्षेत्रातून, ई प्रभागक्षेत्रात
अक्षय गुडधे – ई क्षेत्रातून , क प्रभागक्षेत्रात