कल्याण दि.25 सप्टेंबर :
लोकशाहीमध्ये विरोधी मतांनादेखील स्थान असून त्यांचाही आदर केला पाहिजे. मात्र भाजपकडून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला उखडून टाकण्याचे काम केले जाणार असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रकरांसंदर्भातील ऑडियो क्लिपवर प्रतिक्रिया देताना तपासे यांनी हे टिकास्त्र सोडले.
‘विरोधात बातम्या न येण्यासाठी पत्रकारांना ढाब्यावर न्या’ असा अजब सल्ला देणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर विरोधकांनी तुफान हल्ला चढवला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना महेश तपासे यांनी सांगितले की पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ समजली जाते. त्याच चौथ्या खांबाला उखाडण्याचं काम आता भारतीय जनता पार्टी करणार असल्याचे तपासे म्हणाले. तसेच तुम्ही लोकशाहीत आहात, लोकशाहीमध्ये विरोधी मतांना देखील स्थान असतं. त्याचा आदर केला पाहिजे. मात्र विरोधी विचाराचा, विरोधी वक्तव्याचा आदर भारतीय जनता पार्टी करू शकत नाही. कारण ते लोक मुळातच लोकशाही मानत नसल्याचा गंभीर आरोपही तपासे यांनी यावेळी केला.