
कल्याण दि.22 नोव्हेंबर :
राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात आज कल्याणातही भाजपतर्फे ‘जन आक्रोश’ आंदोलन करण्यात आले. भाजप नेते आमदार रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कल्याण तहसीलदार कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारविरोधात काही दिवसांपूर्वी मोठा मोर्चा काढण्यात आला होता. त्यापाठोपाठ आज संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. ‘ठाकरे सरकार हाय हाय, महाआघाडी सरकार हाय हाय आदी जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.
महाविकास आघाडी सरकार हे वसुली सरकार आहे. सरकारने नेहमीच मायबापच्या भूमिकेत असले पाहिजे. मात्र हे सरकार विचित्र पध्दतीने वागत असल्याची टिका भाजप नेते आमदार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केली. तसेच अमरावती दंगल ही स्पॉन्सर्ड दंगल असल्यासारखे चित्र समोर यायला सुरुवात झाली असून लोकांना त्रास देणे, सर्वसामान्य माणसाना वेठीस धरणे, हे सातत्याने सरकारच्या माध्यमातून होत असल्याचा आरोपही यावेळीं त्यांनी केला. तर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी महिला अत्याचार मोठ्या प्रमाणात होत आहेत. ते कसे थांबवावे ? काय उपाययोजना करावी यासह एसटी कर्मचारी आंदोलनाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार कोणतीही ठोस भूमिका घेताना राज्य सरकार दिसत नाही. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांकडून सरकारचा निषेध करण्यासाठी हे ‘जन आक्रोश’ आंदोलन करण्यात आल्याचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाने तहसिलदार विजय पाटील यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी आंदोलनात माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, नाना सूर्यवंशी यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.