
कल्याण – डोंबिवली दि.26 जून :
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही आता राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने राज्य सरकारविरोधात भाजपतर्फे कल्याण डोंबिवलीतही चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले पाहायला मिळाले.
कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकात खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तर कल्याण शिळ रोडवर आमदार रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. न्यायालयामध्ये रद्द झालेले ओबीसी आंदोलन हे राज्य सरकारचे अपयश आहे. या आरक्षणाबाबत राज्य सरकार आपली बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी भाजपतर्फे करण्यात आला. तसेच न्यायालयाच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजावर दूरगामी परिणाम होणार असून त्याला सर्वस्वी राज्य सरकारच जबाबदार असेल अशी टीकाही यावेळी करण्यात आली.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीमध्ये ठिकठिकणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.